भारत-पाक सामन्यात पावसाचा ‘व्यत्यय’ ; चाहत्यांची निराशा

मँचेस्टर : वृत्तसंस्था – वर्ल्डकप स्पर्धेत भारत-पाकिस्तान या दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी संघामध्ये आज मँचेस्टरमध्ये सामना सुरु आहे. भारताने ३०० धावांचा टप्पा पार केला. मात्र या ऐन रंगात आलेल्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणून प्रेक्षकांची निराशा केली आहे. ४७ व्या षटकात बहुचर्चित पावसाचे आगमन झाल्यामुळे सामना थांबवावा लागला आहे. भारताने ४६. ४ षटकात ४ विकेटच्या बदल्यात ३०५ धावा बनवल्या आहेत.

रोहित आणि राहुल या सलामीवीरांनी १३६ धावांची भागीदारी करून भारताला दमदार सुरवात करून दिली. लोकेश राहुल ५७ धावांवर बाद झाला. द्विशतकाकडे वाटचाल करणारा हिट मॅन रोहित शर्मा १४० धावा काढून बाद झाला. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्याने मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला परंतु तो १९ चेंडूत २६ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला धोनीला देखील मोठी खेळी करता आली नाही. मोठा फटका खेळण्याच्या नादात तो बाद झाला.

पावसाच्या आगमनामुळे चाहत्यांची निराशा

भारत पाक सामन्यात पाऊस येऊन खेळ बिघडणार ही भीती सर्व चाहत्यांना वाटत होती. ती शक्यता अखेर खरी ठरली आहे. पाऊस असाच कायम राहिलास सामना रद्द होऊन दोन्ही संघाला एक एक गुण मिळू शकतो. हा सामना रद्द झाल्यास वर्ल्डकपमध्ये रद्द होणारा हा पाचवा सामना ठरण्याची शक्यता आहे. पूर्ण स्टेडियम चाहत्यांनी भरून गेले आहे. पावसाच्या आगमनामुळे प्रेक्षकांमध्ये चांगलीच निराशा पसरली आहे.