Coronavirus : ‘कोरोना’शी लढण्यासाठी भारत तयार करणार ‘हजमत’ सूट, डॉक्टरांची बनेल ‘ढाल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. आतापर्यंत या व्हायरसमुळे जगभरात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर लाखो लोकांना याची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता संपूर्ण जग कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी संरक्षण कवच तयार करण्याच्या कामाला लागले आहे. या संरक्षण कवचाचे नाव ‘हजमत सूट’ असे आहे. आता भारतही स्वदेशी तत्वावर या सूटची निर्मिती करणार आहे.

जगभरातील अनेक देशांमध्ये या सूटचा वापर करण्यात येत आहे. इबोला किंवा कोरनाचा प्रादुर्भाव जगभरात होतो त्यावेळी हजमत सूट हा डॉक्टर, नर्सेस आणि गरजवंतांसाठी संरक्षण कवच बनले आहे. त्यामुळे डॉक्टर आणि नर्सेस यांना किलर व्हायरसपासून स्वत:चा बचाव करत रुग्णांवर उपचार करणे सहज शक्य होते. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनीही बुधवारी हाच सूट परिधान करून कोरोना पीडितांची पाहणी केली होती.

यामुळे याचे नाव हजमत सूट
हजमत सूट हे हेजार्डस मटेरियल सूटचे संक्षिप्त नाव आहे. या सूटमुळे संपूर्ण शरीर झाकता येते. हा सूट घातक पदार्थ, रसायने आणि जैविक धोकादायक गोष्टींपासून संरक्षण करते. हा सूट डॉक्टर मंडळी रुग्णांवर उपचार करतानाच परिधान करतात. या सोबत चश्मा, ग्लोज आणि गाऊन परिधान केला जातो.

यासाठी वेगळे प्रोटोकॉल
हा सूट परिधान करण्याचे जगभरात वेगवेगळे प्रोटोकॉल आहेत. यावेळी व्हायरस अथवा एखादा आजार पसरूनये याचीही काळजी घेतली जाते. हा सूट तयार करताना व्हायरस अथवा धोकादायक पदार्थ यात शिरकाव करणार नाही, याची काळजी घेतली जाते. यापूर्वी इबोला संक्रमणाच्या वेळीही हा सूट परिधान करणे बंधनकारक करण्यात आले होते.