प्रियंका गांधी चोराच्या पत्नी, संपूर्ण देश त्यांच्याकडे त्याच नजरेने पाहणार

भाजपच्या 'या' महिला नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

भोपाळ : वृत्तसंस्था – प्रियांका गांधीचा पती चोर आहे. त्यामुळे संपूर्ण हिंदुस्तान त्यांना चोराच्या पत्नीच्याच नजरेने पाहणार आहे. असे वादग्रस्त विधान केंद्रीय जलसंसाधन मंत्री उमा भारती यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगडमधील दुर्ग मतदार संघातिल आयोजित प्रचारसभेनंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी हे विधान केले.

संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान, केंद्रीय जलसंसाधन मंत्री उमा भारती छत्तीसगडमधील दुर्ग लोकसभा मतदार संघात गेल्या होत्या. प्रचार सभेनंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी निवडणुकीच्या तोंडावरच प्रियांका गांधी यांचे राजकारणात सक्रीय होण्याबाबतचे काय कारण आहे ? तसेच प्रियंका गांधी लोकसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चां होत आहेत. असा प्रश्न त्यांना विचारला. भारतात लोकशाही आहे. त्यामुळे कोणताही इच्छूक उमेदवार कोणत्याही मतदार संघातून निवडणूक लढू शकतो. मात्र प्रियंका गांधी यांच्या पतीवर चोरीचा आरोप आहे, त्यामुळे चोराच्या पत्नीकडे ज्या नजरेने पाहिले जाते त्याचप्रकारे हिंदुस्तान प्रियांका गांधीकडे पाहणार आहे. असे केंद्रीय जलसंसाधन मंत्री उमा भारती यांनी म्हंटले.

निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि समाजवादी पक्षाचे नेते आजम खान यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे केलेल्या कारवाईबाबत उमा भरती यांना विचारले. त्यावेळी योगी आदित्यनाथ आणि आजम खान या दोघांना निवडणूक आयोगाने समान दंड सुनावला आहे. मात्र दोघांनीही जो अपराध केला आहे त्यात खूप फरक आहे. असेही त्यांनी म्हंटले.