भारताचा वेस्ट इंडिजवर ५९ धावांनी विजय

त्रिनिदाद : भुवनेश्वरकुमार याच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने दुसऱ्या वन डे सामन्यात वेस्ट इंडिजवर डकवथ लुईस नियमानुसार ५९ धावांनी मात केली. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने ७ बाद २७९ धावांपर्यंत मजल मारली. मात्र, विंडीजची फलंदाजी सुरु झाल्यानंतर सामन्यात पावसाने व्यत्यय आणला.  त्यामुळे विडिंजला ४६ षटकात २७० धावांचे लक्ष्य देण्यात आले. विंडीजचा संघ ४२ षटकात २१० धावा करु शकला. एविन लुईसचा अपवाद वगळता एकही विंडिज फलंदाज भारतीय गोलंदाजासमोर टिकू शकला नाही. भारताकडून भुवनेश्वर कुमारने ४, कुलदीप यादव, मोहम्मद शामीने प्रत्येकी २ तर खलिल अहमद आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

२७९ धावांचा पाठलाग करताना विंडिजच्या फलंदाजांनी डावाची सुरुवात चांगली केली. पहिल्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी केल्यानंतर भुवनेश्वर कुमारने ख्रिस गेलला बाद केले. त्यानंतर शाई होप, शेमरॉन हेटमायर झटपट बाद झाले. त्यानंतर लुईस (६५) आणि निकोलस पुरन (४२) यांनी दमदार खेळ करत सामन्यात रंगत आणली. अखेरीस कुलदीपने एविन लुईसला बाद करीत ही जोडी फोडली.

त्यानंतर भुवनेश्वर कुमारेने अखेरची फळी कापून काढत भारताला विजय मिळवून दिला. त्याअगोदार कर्णधार विराट कोहलीचे शतक, मुंबईकर श्रेयस अय्यरची अर्धशतकी खेळी याच्या जोरावर भारताने २७९ धावांपर्यत मजल मारली. भारताच्या डावाची सुरुवात खराब झाली. सामन्याच्या पहिल्याच षटकात शेल्डन कोट्रेलने शिखर धवनला बाद करुन भारताला धक्का दिला. त्यानंतर रोहित शर्मा हाही रोस्टन चेसच्या गोलंदाजीवर १८ धावांवर परतला. ऋषभ पंतही चमक दाखवू शकला नाही. ब्रेथवेटने पंतचा २० धावांवर त्रिफळा उडविला. त्यानंतर विराट आणि अय्यर यांनी चौथ्या विकेटसाठी १२५ धावांची भागीदारी करुन भारताचा डाव सावरला. विराटने आपले वन डे मधील ४२ वे शतक पूर्ण केले. वन डे संघात संधी मिळालेल्या श्रेयस अय्यरने संधीचे सोने करीत अर्धशतक झळकाविले. वेस्ट इंडिजकडून कार्लोस ब्रेथवेटने ३ तर शेल्डन कॉट्रेल, जेसन होल्डर आणि रोस्टन चेसने प्रत्येकी एक बळी घेतला.

आरोग्यविषयक वृत्त