सहा महिन्यात भारतात ६ लाख ९५ हजार सायबर हल्ले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय बँका, कंपन्या या सायबर सुरक्षेबाबत अजूनही खूप मागे असल्याचे व त्याकडे गंभीरपणे पहात नसल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. त्यामुळे या वर्षाच्या पहिल्या सहामाहीमध्ये भारतातील सायबर हल्ल्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जानेवारी ते जून या कालावधीत भारतात सायबर हल्ल्याचे तब्बल ६.९५ लाख गुन्हे घडले व यात रशिया, अमेरिका, चीन आणि नेदरलँड येथून झालेल्या सायबर हल्ल्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसत आहे. एफ सेक्युअर या सायबर सुरक्षेसंबंधी संस्थेच्या अहवालात ही माहिती दिली आहे.

पुण्यातील कॉसमॉस बँकेने सुरक्षा विषयीचा मिळालेला अर्लट गांभीर्याने न घेतल्याने बँकेवर झालेल्या सायबर हल्ल्यात तब्बल ९४ कोटी रुपये लंपास करण्यात आले होते. त्यात सर्वाधिक रक्कम ही रशिया आणि मेक्सिको येथून काढली गेली आहे. रशिया, अमेरिका, चीन आणि नेदरलँडमधून या सहामाहीमध्ये ४.३६ लाख सायबर हल्ले झाल्याचे एफ सेक्युअरने म्हटले आहे. जगभरातून होणाऱ्या सायबर हल्ल्यांची माहिती जमा करण्यासाठी तसेच, सायबर गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी या संस्थेने जगभरात ४१ ठिकाणी हनिपॉट्स नेमले आहेत. या हनिपॉट्सनी दिलेल्या आकडेवारीवरून हा अहवाल करण्यात आला आहे.

भारतातून परदेशात केल्या जाणाऱ्या सायबर हल्ल्याबाबतही यात माहिती आहे. मात्र हे प्रमाण अतिशय कमी म्हणजे ३५,५६३ आहे. हे सायबर हल्ले भारतातून प्रामुख्याने आॅस्ट्रिया, नेदरलँड, ब्रिटन, जपान आणि युक्रेन देशांत करण्यात आले.

भारत २१व्या क्रमांकावर : सर्वाधिक सायबर हल्ले होणाऱ्या देशांच्या जागतिक सूचीमध्ये भारताचा २१ वा क्रमांक लागतो, असे या संस्थेने म्हटले आहे. तर, आपल्या देशातून अन्य देशांत सायबर हल्ले करणाऱ्या देशांच्या सूचीमध्ये भारत तेराव्या क्रमांकावर आहे. जगात सर्वाधिक सायबर हल्ले अमेरिकेत होतात.