घरचे दागिने विकून टीम बनवली, भारताला जिंकून दिला ‘वर्ल्ड कप’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताच्या दिव्यांग क्रिकेट संघानं विश्वचषक जिंकला. या कामगिरीचे श्रेय दिव्यांग क्रिकेट असोसिएशनचा महासचिव रवि चौहान यांना जात. 2011 मध्ये माजी क्रिकेटपटूंच्या मदतीनं रवी चौहान यांनी दिव्यांग क्रिकेटपटूंच्या असोसिएशनची स्थापना केली. त्यानंतर अनेक ठिकाणी शिबिरं घेऊन खेळाडूंची निवड केली. त्याच्या मेहनतीचा परिणाम म्हणजे भारताच्या दिव्यांग क्रिकेट संघानं पहिल्या वर्ल्ड कपवर नाव कोरलं.

फरीदाबादमध्ये राहणाऱ्या रवि चौहानला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची आवड होती. मात्र दिव्यांग असल्याने इतर मुले त्यांना खेळण्यासाठी घेत नसत. परिस्थितीमुळे त्यांना क्रिकेटची आवड असूनही क्रिकेटपासून लांब राहावे लागले. त्यांना घरापासून लांब अंतरावर असलेल्या मैदानावर पोहचण्यासाठी एकवेळ मित्रांकडून उधारीनं पैसे घ्यायला लागायचे. त्यावेळी त्यांनी निर्धार केला की आपल्यासोबत जे झालं ते इतरांसोबत होऊ नये. 2011 मध्ये माजी क्रिकेटपटूंच्या मदतीनं रवी चौहानने दिव्यांग क्रिकेटपटूंच्या असोसिएशनची स्थापना केली.

रवि चौहान यांनी दिव्यांग खेळाडूंसाठी वेगळी जागा तयार केली. देशभर फिरून प्रतिभावान खेळाडूंची निवड केली. त्यानंतर माजी क्रिकेटपटूंच्या मदतीनं एक संघ तयार केला. दिव्यांग क्रिकेटपटूंसाठी खास पॅड आणि ग्लोव्हज तयार करून घेतले. तसेच सॉफ्ट बॉलऐवजी लेदर बॉल वापरण्यात आला. दिव्यांग क्रिकेट संघ तयार करत असताना मात्र एकही प्रायोजक मिळत नव्हता. तेव्हा घरातील दागिने गहाण ठेवले. मित्रांकडून उसने पैसे घेतले. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर दिव्यांग क्रिकेटपटूंचे आयुष्य सुधारण्याची आशा रवि चौहान यांना आहे.