अभिनंदन यांचे ‘ते’ ट्विटर अकाउंट बनावट ; भारतीय वायुदलाची माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांच्या नावाचा फायदा घेत सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार केले गेल्याची माहिती समोर आली आहे. या बोगस अकाउंटद्वारे त्यांची माहिती आणि काही फोटो शेअर केले गेले आहेत. त्यात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचेही कौतुक करण्यात आले होते.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , विंग कमांडर अभिनंदन आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या भेटीचे छायाचित्र शनिवारी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही हे छायाचित्र शेअर करण्यात आले होते. त्याचवेळी अभिनंदन यांच्या नावाने तयार केलेल्या बोगस ट्विटर हँडलवरूनही हे छायाचित्र शेअर करण्यात आले. त्यानंतर या बोगस अकाउंटच्या फॉलोअर्सची संख्या हजारोंच्या घरात गेली होती.

हे अकाउंट बनावट असल्याची माहिती उत्तर प्रदेशच्या आझमगढमधील एका तरुणानं पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी हे प्रकरण सायबर सेलकडे सोपवले. सायबर सेलने हे तपास करून हे ट्विटर अकाउंट बोगस असल्याचे स्पष्ट केले.

भारतीय वायुदलाचे आवाहन-

भारतीय वायुदलाने @Abhinandan_wc या नावाने सुरू करण्यात आलेले ट्विटर अकाउंट बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे. अभिनंदन यांच्या नावाने कोणत्याही अनधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर माहिती विचारली गेल्यास किंवा अन्य कोणत्याही गोष्टीची मागणी केली गेल्यास, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे. सध्या हे अकाउंट डिॲक्टिवेट करण्यात आले आहे .