हवाई दलाचे सामर्थ्य वाढले ; ताशी ३१५ किमी वेग असणारे शक्तीशाली चिनुक हेलिकॉप्टर्स आजपासून देशसेवेत दाखल

चंदीगड : वृत्तसंस्था – देशाच्या सीमांवरील वाढत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी अमेरिकेची कंपनी बोइंगकडून निर्माण करण्यात आलेले चिनूक ‘सीएच-47आय’ हेलिकॉप्टर वायुदलाच्या ताफ्यात चंदीगड येथे सामील झाले. अति उंचीवर अधिक अवजड सामग्री वाहून नेण्यासाठी सध्या भारताकडे रशियन बनावटीचे Mi-26 ही हेलिकॉप्टर्स सेवेत आहेत. त्यानंतर आता चिनुकचीही यात भर पडली आहे.

पहिल्या खेपेतील चार चिनुक हेलिकॉप्टर्सचे आज राष्ट्रर्पण झाले. ही चार ॲडव्हान्स डबल रोटर हेलिकॉप्टर्स भारतीय सैन्याला प्रत्यक्ष लढाईच्या वेळी आणि इतर वेळी सैन्याच्या पथकांना एका जागेवरुन दुसऱ्या जागी वाहून नेण्यासाठी उपयोगात येणार आहेत. या विमानांची पहिली खेप चंदीगडच्या 3-BRD येथे जोडणीसाठी दाखल झाली आहे. अमेरिकेशी झालेल्या करारानुसार हवाई दलाला अशी १५ हेलिकॉपटर्स मिळणार आहेत.

चिनुक हेलिकॉप्टरची वैशिष्ट्ये
खराब हवामानात जिथे अन्य हेलिकॉप्टर वापरता येत नाहीत तिथे चिनुक हेलिकॉप्टर वापरता येते. या हॅलिकॉप्टरचा ताशी ३१५ किमी वेग आहे. सियाचीन आणि लडाख अशा ठिकाणी ‘चिनुक’ हेलिकॉप्टर वायुसेनेसाठी फायदेशीर ठरणार आहे. अमेरिकन बनावटीचे CH-47F (I) चिनुक ही शक्तीशाली हेलिकॉप्टर्स आजपासून देशसेवेत दाखल होणार आहेत. या हेलिकॉप्टरमध्ये पूर्णपणे एकीकृत डिजिटल कॉकपिट मॅनेजमेंट सिस्टीम आहे. या हेलिकॉप्टरचा वापर १९ देशात केला जातो. अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेट सेंटर या इमारतींवर हल्ला करणाऱ्या ओसामा बिन लादेनचा अमेरिकेने पाकिस्तानात घुसून या चिनुक हेलिकॉप्टर्सच्या मदतीने खात्मा केला होता.

चिनुकच्या या राष्ट्रार्पण कार्यक्रमासाठी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ, वेस्टर्न एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ (एओसी-इन-सी) एअर मार्शल आर. नांबियार यांनी हजेरी लावली.