विंग कमांडर अभिनंदननं पाकिस्तानला असा शिकवला होता ‘धडा’, आजही होतात ‘वेदना’

नवी दिल्ली :वृत्त संस्था  – आजच्या दिवशी एक वर्षापूर्वी भारतीय हवाई दलाचे पराक्रमी विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानात घुसून त्यांना अद्दल घडवली होती. विंग कमांडर अभिनंदन यांनी हवाई चकमकीत आपल्या जुन्या मिग-21 लढाऊ विमानाने पाकिस्तानचे अत्याधुनिक एफ-16 लढावू विमान पाडले होते. त्यांनी पाकिस्तानी पायलटलाही मारले होते. यादरम्यान अभिनंदन यांचे लढावू विमान मिग-21 दुर्घटनाग्रस्त झाले आणि ते पाकिस्तानच्या हद्दीत उतरल्याने पाकच्या हाती सापडले.

पाकिस्तान लष्कराने भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांना पकडले होते. परंतु, भारताच्या दबावापुढे पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारला झुकावे लागले होते आणि अभिनंदन यांना 48 तासात माघारी पाठवावे लागले होते. 1 मार्च 2019 ला भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन अटारी वाघा बॉर्डरवरून पुन्हा भारतात आले होते. विंग कमांडर अभिनंदन यांच्या पराक्रमामुळे पाकिस्तानला हवाई चकमकीत धुळ चारण्यात आली होती.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये 14 फेब्रुवारी 2019 ला सीआरपीएफच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला झाला होता. यामध्ये सीआरपीएफचे 40 पेक्षा जास्त जवान शहीद झाले होते. हा हल्ला दशहतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने घडवून आणला होता. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला होता. 26 फेब्रुवारी 2019 ला भारतीय हवाई दलाने मिराज 2000 लढाऊ विमानांनी सीमा पार करून आणि पकिस्तानच्या बालाकोटमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी ठिकाणांवर बॉम्ब टाकले होते. यामध्ये मोठ्या संख्येने दहशतवादी ठार झाले होते.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या या कारवाईने पाकिस्तान गडबडून गेला होता. पाकिस्तानने प्रथम बालाकोट एयर स्ट्राइक लपवण्याचा प्रयत्न केला, परंतु सत्य लपवण्यात अपयश आले. जगाला ही बातमी समजली की, भारताने पाकच्या बालाकोटमध्ये घुसून दहशतवादी ठिकाणांवर बॉम्ब वर्षाव केला आणि पुलवामा हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. बालाकोट एयर स्ट्राइक पाकिस्तान जगाला सांगू शकत नव्हता आणि लपवू देखील शकत नव्हता.

यानंतर 27 फेब्रुवारी 2019 ला पाकिस्तानने एफ-16 लढाऊ विमानांनी जेव्हा पुन्हा हल्ला केला, तेव्हा भारतीय हवाई दलाने जोरदार उत्तर देत त्यांना पळवून लावले. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचे एक एफ-16 लढाऊ विमानसुद्धा पाडले.