अभिमानास्पद ! भारतीय वंशाच्या 14 वर्षाच्या मुलीनं शोधला ‘कोरोना’चा उपाय, अन् मिळवले 18 लाख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत असताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशातील शास्त्रज्ञ कोरोनविरुद्धच्या लस आणि औषधावर दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान भारतासाठी अभिमानास्पद आणि सकारात्मक ठरणारी बातमी समोर आली आहे. एका 14 वर्षीय मुलीने आपल्या हुशारीने कोरोनाला हरवण्याचा उपाय शोधला आहे. ही मुलगी भारतीय वंशाची असून तिचे नाव अनिका चेब्रोलू असे आहे.

अनिकाने 2020 3M आव्हान पूर्ण करत 25 हजार डॉलर म्हणजेच 18 लाख 35 हजार 375 रुपांचे बक्षीस जिंकले आहे. अनिकाने कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी प्रभावी ठरत असलेल्या थेरेपीचा शोध लावला आहे. या थेरेपीमध्ये कोरोना व्हायरसच्या स्पाइक प्रोटीनला बांधण्यासाठी एक रेणू शोधण्यात आला. त्यासाठी इन सिलिको पद्धतीचा वापर करण्यात आला होता. या कामगिरीबद्दल बोलताना अनिकाने सांगितले की, गेल्या 2 दिवसात मला दिसून आलं की, माझ्या प्रोजेक्टबाबत चर्चा होत आहे. यात कोरोना व्हायरसचा समावेश आहे आणि ही थेरपी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करेल. लवकरच आपण सर्वांनी पूर्वीप्रमाणे आयुष्य जगावं असे मला वाटतं, असे अनिकाने सांगितले.

अनिका ही मूळची भारतीय असून अमेरिकेत वास्तव्यास आहे. तिने आठवीत असताना हा प्रकल्प तयार केला होता. मात्र, कोरोनाच्या उपचारांसाठी हा प्रकल्प परिणामकारक ठरु शकतो याची तिला कल्पनाही नव्हती. आधी इन्फ्यूएंझा व्हायरसच्या प्रोटिनशी बांधले जाणारे लीड कंपाऊंड ओळखण्यासाठी ईन-सिलिको पद्धती वापरण्याचे तिचा प्रयत्न होता. आता यात तंत्राचा वापर करुन कोरोनाशी लढता येऊ शकतं. अनिकाचा हा प्रकल्प 3M Young Scientist Challenge मध्ये दाखल करण्यात आला होता.

दरम्यान अनिकानं दिलेल्या माहितीनुसार, युवा शास्त्रज्ञाचा पुरस्कार मिळाला असला तरी तिचं काम अद्यापही संपलं नाही आहे. ति म्हणाली, कोरोनाच्या औषधावर माझे संशोधन सुरु आहे. आपण असं जगत आहोत हा विचारही वेडेपणा आहे. कोविड-19 संपूर्ण जगभर पसरत आहे. या व्हायरसच्या प्रभावामुळे कमी वेळात जगावर याचा गंभीर परिणाम झाला. त्यामुळे मी, माझ्या मार्गदर्शकांच्या मदतीने कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी दिशा बदलण्याचा विचार केला असल्याचे तिने सांगितले.