US : जो बायडेन यांच्या शपथविधी कार्यक्रमाची जबाबदारी भारतीय वंशाच्या ‘या’ नेत्याकडे !

वॉशिंग्टन : पोलीसनामा ऑनलाइन – नव्या वर्षामध्ये 20 जानेवारी 2021 रोजी बायडेन यांचा शपथविधी पार पडणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून जो बायडेन आणि उपराष्ट्रपती म्हणून कमला हॅरिस यांच्या शपथविधीची तारीख निश्चित झालीय. या शपथविधीच्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जो बायडेन यांनी ’प्रेसिडेंशिअल इनॉग्रल कमिटी’ची नियुक्ती केली आहे. या चार सदस्यीय समितीमध्ये भारतीय वंशाच्या माजू वर्गीज यांची निवड केली आहे.

माजू वर्गीज हे वकील आहेत. त्यांच्या जन्म अमेरिकेत झाला आहे. वर्गीज यांचे आई-वडील केरळमधील तिरुवल्लामधून अमेरिकेमध्ये स्थायिक झाले होते. अमेरिकेच्या नव्या अध्यक्षांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाची जबाबदारी देण्यात आलेल्या समितीमध्ये कार्यकारी संचालक माजू वर्गीज यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी टोनी अ‍ॅलन, उपकार्यकारी संचालक एरिन विल्सन आणि युवाना कॅन्सेला यांचा समावेश आहे.

अमेरिका देशाचे अध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या शपथविधी सोहळ्याचे नियोजन करण्यासाठीच्या समितीत माझा समावेश होणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. अमेरिकेतील नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचणार नाही, अशा स्वरूपामध्ये शपथविधीचे आयोजन करण्यात येईल. तसेच अमेरिकेचं सामर्थ्य दाखवून दिलं जाईल”, असं वर्गीज यांनी एका प्रसिद्धिपत्रकात म्हटलंय.

जो बायडेन आणि कमला हॅरिस यांच्या ऐतिहासिक शपथविधीनंतर कोरोना विषाणू फैलाव विरोधात काम सुरू करणे आणि अर्थव्यवस्थेच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी जोमाने कामाला सुरुवात होईल, असेही वर्गीज म्हणाले. माजू वर्गीज यांनी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये जो बायडेन आणि कमला हॅरिस यांच्या प्रचार अभियानाचे मुख्य संयोजक म्हणून काम पाहिलंय.