व्हाईट हाऊसमध्ये पुणेरी पत्रकारानं ट्रम्प यांना प्रश्नानं केलं ‘गारद’

वॉशिंग्टन डीसी : वृत्तसंस्था – अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्यांना एका पुणेरी प्रश्नाने अवाक केले. गेली साडेतीन वर्षं अमेरिकन जनतेशी खोटे बोलत असल्याचा तुम्हाला पश्चात्ताप होतोय का? असे थेट डोनाल्ड ट्रम्प यांना एका पत्रकाराने भर पत्रकार परिषदेत विचारला. त्यावेळी या प्रश्नाच्या टोकदार थेटपणामुळे आसपासचे सगळेच क्षणभर अवाक झाले. हा प्रश्न विचारणारे एस. व्ही. दाते मुळात पुण्यात जन्मलेले अमेरिकन पत्रकार आहेत.

दाते हे हफिंग्टन पोस्टसाठी काम करतात. ते गेली तीन दशके अमेरिकेत पत्रकार म्हणून वावरत आहेत. ते व्हाईट हाऊस कॉरस्पाँडंट म्हणून या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. एका भारतीय-अमेरिकी पत्रकाराने ट्रम्प यांना अवघड वाटणारा प्रश्न थेट विचारल्याने दाते यांच्या धैर्याचे कौतुक होत आहे. शिरीष दाते यांनी हा प्रश्न विचारण्यासाठी गेली 5 वर्ष वाट पाहात होतो, असे म्हटले आहे.

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्याचसंदर्भात अधिक प्रश्न काल झालेल्या पत्रकार परिषदेत विचारण्यात आले. अनेक पत्रकारांनी ट्रम्प यांना अडचणीचे वाटू शकतील, असे प्रश्न विचारले. पण दाते यांच्या थेट आणि निर्भिड प्रश्नाने अनेकांना अवाक केले. दात्यांच्या प्रश्नावर ट्रम्प यांनी सुरुवातीला कळले नाही, पुन्हा विचारा, असे म्हटले. आणि दाते यांनी पुन्हा प्रश्न विचारल्यावरही ट्रम्प यांनी उत्तर द्यायचं टाळले.