‘आता भारतीयांच्या हाती अमेरिकेचा लगाम’, राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे वक्तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा भारतीय वंशाच्या व्यक्तींवर खूपच विश्वास असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर ५० दिवसांच्या आत त्यांनी प्रमुख महत्वाच्या पदांवर ५५ पेक्षा जास्त भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांची नियुक्ती करण्यात आली. तसेच जो बायडेन यांच्याकडून आता अमेरिकेचा लगाम भारतीयांच्या हाती असल्याचे वक्तव्य करण्यात आले होते. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच नासाच्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

बायडेन यांनी मंगळावर पर्सिव्हिअरन्स रोव्हरच्या ऐतिहासिक लॅन्डिंग संदर्भात नुकतीच नासाच्या संशोधकांशी चर्चा केली. या मोहीमध्ये भारतीय वंशाच्या संशोधक स्वाति मोहन यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्या सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झाल्या होत्या. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी, “भारतीय वंशाच्या व्यक्तींच्या हाती अमेरिकाचा लगाम आहे. त्यामध्ये तुम्ही (स्वाति मोहन), माझ्या उपराष्ट्राध्यक्ष (कमला हॅरिस), माझे भाषण लिहीणारे (विनय रेड्डी),” अशी यादीच त्यांनी या चर्चेदरम्यान वाचून दाखवली. जो बायडेन यांनी २० जानेवारी रोजी अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी ५५ महत्वाच्या प्रशासकीय पदांवर भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांची नियुक्ती करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

जो बायडेन यांनी जाहीर केलेल्या ५५ जणांच्या यादीमध्ये उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस आणि नीरा टंडन यांचा समावेश नाही आहे. नीरा टंडन यांनी व्हाइट हाउस ऑप मॅनेजमेंट अ‍ॅण्ड बजेटच्या निर्देशक पदासाठी अर्ज दाखल केला होता. पण काही कारणामुळे त्यांनी तो अर्ज मागे घेतला होता. अमेरिकन प्रशासनामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्याप्रमाणात भारतीय वंशाच्या लोकांचा समावेश करण्यात आला आहे.

या अगोदर अमेरिकेचे ४४ वे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळामध्येसुद्धा अनेक भारतीय अमेरिकन नागरिकांना प्रशासनामध्ये सहभागी करण्यात आले होते. मात्र जो बायडेन यांनी आपल्या प्रशासनात बराक ओबामा यांच्यापेक्षा जास्त भारतीयांची निवड करत एक नवा इतिहास घडवला आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या कार्यकाळामध्ये भारतीयांना प्रशासकीय नियुक्त्यांमध्ये जास्त संधी देण्यात आली नव्हती. मात्र ट्रम्प हे असे पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होते ज्यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत आणि कॅबिनेट दर्जाच्या पदांवर भारतीय अमेरिकन नागरिकांची नियुक्ती केली होती. या अगोदर अमेरिकेच्या कोणत्याही राष्ट्राध्यक्षांनी असे केले नव्हते.

बायडेन यांनी काही दिवसांपूर्वीच भारतीय वंशाच्या माजू वर्गीस यांची आपल्या उप सहाय्यक आणि व्हाऊट हाऊस लष्करी कार्यालयाच्या (डब्लूएचएमओच्या) निर्देशकपदी नियुक्ती केली आहे. बायडेन यांच्या निवडणुक प्रचारामध्ये आणि शपथविधी सोहळ्यातील आयोजन करणाऱ्या सदस्यांच्या गटामध्ये माजू वर्गीस यांचा समावेश होता. अशा प्रकारे जो बायडेन यांच्या प्रशासनामध्ये भारतीयांची संख्या दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे.