भारतीय सैन्याकडून ‘जैश-ए-मोहम्मद’चा लॉन्चिंग पॅड, 3 चौक्या ‘नेस्तनाभूत’

काश्मीर : वृत्तसंस्था – पाकिस्तानकडून सतत होणार्‍या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतीय सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. नीलम आणि लिपा खोऱ्याच्या परिसरात भारतीय सैन्याने कारवाई करून जैश-ए-मोहम्मदचा लॉन्चिंग पॅड नष्ट केला आहे तसेच तीन पाकिस्तानी चौक्याही उध्वस्त केल्या आहेत. त्यामुळे जैश-ए-मोहम्मदचे मोठे नुकसान झाले आहे.

सैन्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकव्याप्त काश्मीरच्या लिपा खोऱ्यामध्ये जैश-ए-मोहम्मदचा लॉन्चिंग पॅड m4 नष्ट करण्यात आला आहे. या कारवाईत जैश-ए-मोहम्मदचे मोठे नुकसान झाले आहे. भारतीय सैन्याने केलेल्या या कारवाईत अनेक अतिरेकी ठार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच या कारवाईत नीलम खोऱ्यातील तीन चौक्या नष्ट करण्यात आल्या आहेत. या चौक्यांच्या मदतीने पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यासाठी पाठवण्यात आले होते .

पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. शनिवारी रात्री पाकिस्तानने काश्मिरच्या उरी सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्याच्या चौक्यांना लक्ष्य करत जोरदार गोळीबार केला होता. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारतीय जवान संतोष गोप शहीद झाले होते. ते झारखंडचे रहिवासी होते.

Visit : Policenama.com