Video : भारतीय तटरक्षक दलाची कौतुकास्पद कामगिरी, समुद्रात अडकलेल्या 138 जणांना वाचवले

पोलीसनामा ऑनलाइन – तौक्ते वादळामध्ये भारतीय तटरक्षक दलाने अतिशय महत्त्वपूर्ण जीवरक्षक कामगिरी बजावली आहे. दमण कोस्ट गार्ड एअर स्टेशनच्या चेतक हेलिकॉप्टरने सातपाटी येथील 138 जणांचे तर गोव्यातील आणखी एका चेतकने वेंगुर्ला दीपगृह येथील दोन कर्मचाऱ्यांचे प्राण वाचवले. या थरारक शौर्याचा व्हिडीओ तटरक्षक दलाने ट्विटकरून शेअर केला आहे.

दमण कोस्ट गार्ड एअर स्टेशन येथून निघालेल्या कोस्ट गार्ड हेलिकॉप्टर चेतकने सातपाटी जीएएल कन्स्ट्रक्टरच्या समुद्रात जहाजावर अडकलेल्या सर्व 138 कर्मचाऱ्यांची सुटका केली आहे. तटरक्षक दलाने अत्यंत जबाबदारीने आणि सुयोग्य व्यवस्थापनासह ही कामगिरी पार पाडली.

तर कोस्ट गार्ड एअर एन्क्लेव्ह गोवा येथून निघालेल्या आणखी एका चेतक हेलिकॉप्टरने वास्कोच्या उत्तरेकडे 38 समुद्री मैलांवर असलेल्या वेंगुर्ला दीपगृहातील 2 कर्मचाऱ्यांना वाचवले आहेत. या सर्वांना यशस्वीरीत्या किनाऱ्यावर आणण्यात आले. तौक्ते वादळामुळे वाहणारे वेगवान वारे आणि बदलत्या हवामानामुळे खवळलेला समुद्र यामुळे येथील विद्युतदपुरवठा खंडित झाला होता. तसेच या दीपगृहाचेही मोठे नुकसान झाले आहे.