कोविड-19 च्या दुसर्‍या लाटेत टेस्टिंगबाबत ICMR ने जारी केली अ‍ॅडव्हायजरी, एकदा पॉझिटिव्ह झाल्यानंतर RT-PCR टेस्टची नाही आवश्यकता

नवी दिल्ली : वृत्त संस्था- कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने देशात कहर सुरू असतानाच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) कडून कोरोना टेस्टिंगबाबत नवीन अ‍ॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे.

काय आहे आयसीएमआरची अ‍ॅडव्हायजरी
आयसीएमआरच्या अ‍ॅडव्हायजरीमध्ये सांगितले आहे की, जर कुणी व्यक्ती रॅपिड अँटिजेन टेस्ट (RAT) किंवा आरटी-पीसीआर टेस्टच्या दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह आढळला असेल तर त्यास दुसर्‍यांदा आरटी-पीसीआर करण्याची आवश्यकता नाही.

यासोबतच, अ‍ॅडव्हायजरीमध्ये म्हटले आहे की, लॅबोरॅटरीजवर वाढत चाललेल्या दबावामुळे जर कुणी निरोगी व्यक्ती एका राज्यातून दुसर्‍या राज्याचा प्रवास करत असेल तर त्यास आरटी-पीसीआर टेस्ट करण्याची सूट दिली जाऊ शकते.

याशिवाय, पुढे म्हटले आहे की, सर्व विना लक्षणांचे लोक जे आवश्यक प्रवास करत आहेत, त्यांनी आवश्यक कोरोना प्रोटोकॉलचे पालन करावे.