World Cup : ‘त्या’ खेळाडूच्या निवडीमागे भाजपचे कनेक्शन ?

मुंबई : वृत्तसंस्था – आगामी वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची सोमवारी घोषणा करण्यात आली. या संघात अष्टपैलू रवींद्र जडेजाला १५ सदस्यांच्या संघात स्थान देण्यात आले. याच जडेजाला वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीच्या अखेरच्या वन डे मालिका संघात स्थान देण्यात आले नव्हते. हार्दीक पांड्याने माघार घेतली, म्हणून त्याची वर्णी लागली. त्यातही मिळालेल्या तीन संधीत त्याला फार काही छाप पाडता आली नाही. संघात निवड झाल्यानंतर जडेजाने अवघ्या चार तासात भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे जडेजाच्या निवडीमागे भाजपचे कनेक्शन असल्याची चर्चा रंगत आहे.

रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबाने नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर लगेच रिवाबा जामनगर मतदारसंघातून लोकसभेचे तिकिट मिळाले. गेल्या महिन्यात रिवाबाने भाजपाचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे जडेजाची मोठी पंचायत झाली होती. कारण त्याच्या वडीलांनी आणि बहिणीने गेल्या महिन्यातच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पण, जडेजाने अखेर सोमवारी भाजपाला पाठींबा जाहीर केला.

जडेजाची वर्ल्ड कप संघात निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे स्वागत केले. त्यांनीही ट्विट करत लिहीले की, ‘रवींद्र जडेजाचे आभार… आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात निवड झाल्याबद्दल तुझे अभिनंदन.’