भारतीय अर्थव्यवस्था रुळावर येण्याची चिन्हे : दास

पोलिसनामा ऑनलाईन टीम – लॉकडाउन शिथिल केल्यानंतरच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत होण्याच्या दिशेने वाटचाल करील असल्याचा विश्वास रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला. लोकांच्या मनात विश्वास निर्माण करून आर्थिक स्थिरता टिकवतानाच, पुन्हा वृद्धीच्या दिशेने वाटचाल करीत अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत करणे महत्त्वाचे आहे.

‘एसबीआय बँकिंग अँड इकॉनॉमिक्स कॉनक्लेव्ह’ या परिषदेत त्यांनी सांगितले, की भारतीय कंपन्या व उद्योगांनी कोविड पेचप्रसंगाच्या काळातही चांगला प्रतिसाद दिला. पुरवठा साखळ्या केव्हा पूर्ववत होतील हे अजून अनिश्चित आहे. मागणी पुन्हा पूर्ववत कधी होणार, कोरोना साथीचे स्थायी परिणाम काय असतील यावर पुढील आर्थिक वाढ विसंबून आहे. लक्ष्य केंद्रित व सर्वंकष सुधारणा उपायांनी सरकारने आधीच वाढीला पूरक वातावरण तयार केले आहे.

कोविड साथीनंतरच्या काळात आर्थिक कृतिशीलता व्यापक करण्यासाठी अभिनव मार्गाचा अवलंब करण्यात आला. त्यातून पुन्हा समतोल साधला जाऊन विकासाचे नवे घटक उदयास येतील. आर्थिक स्थिरता टिकवणे, बँकिंग प्रणाली मजबूत राखणे व आर्थिक क्रियाशीलता शाश्वत ठेवणे यात समतोल साधण्याचा प्रयत्न रिझव्र्ह बँक करीत आहे.

कोविडोत्तर काळात अधिक काळजीपूर्वक मार्गक्रमण करताना चक्राकार नियमन उपाययोजनांचा फेरविचार करावा लागेल. आर्थिक क्षेत्र नियमनात काही सूट दिल्याशिवाय पूर्ववत होणार नाही. किंबहुना ते आता नित्य नूतन वास्तव असेल. पत धोरण समितीने फेब्रुवारी 2019 पासून दर कमी केले आहेत, त्यामुळे वाढीस चालना मिळेल.