नाही मिळत कामगार ! मजुरांना परत बोलविण्यासाठी विमानाची तिकीटं, जेवणासह एकदम ‘फ्री’मध्ये राहण्याची सोय करतायेत कंपन्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस महामारीमुळे देशात अचानक लॉकडाऊन केले गेले होते. २ महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे जवळपास सर्व दुकाने, उद्योग व कंपन्या बंद पडल्या. ज्यामुळे कामगार आणि कमी पगाराचे लोक निराधार व बेरोजगार झाले. कामाअभावी कामगार त्यांच्या गावी जाऊ लागले. कोणी सायकलवरून घरी पोहोचले, तर कोणी हजारो किलोमीटर पायी चालत गेले. आता अनलॉक सुरू झाले आहे, कंपन्या उघडल्या आहेत आणि आता ते कामगारांना परत बोलावत आहेत, पण ते परत येण्यास घाबरत आहेत.

कंपन्या परप्रांतीय कामगारांना परत आणण्यासाठी विविध प्रकारची प्रलोभने देत आहेत. तर काही कंपन्या शहरी भागात कामगारांना आकर्षित करण्यासाठी विनामूल्य प्रवासाची तिकिटे, निवास आणि भोजन यासारखे फायदे देण्याचे आश्वासन देत आहेत. इतर लोक जवळच्या ठिकाणाहून नवीन लोकांना कामावर घेत आहेत.

कामासाठी लोकांना पाठवण्यासाठी गावच्या प्रमुखांशी देखील कंपन्या बोलत आहेत. त्या बदल्यात कंपन्या मजुरांची सुरक्षा सुनिश्चित करत आहेत आणि त्याचबरोबर ते स्वत:च त्यांची व्यवस्थाही करण्यास तयार आहेत. बर्‍याच कामगारांनी परत येण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे, पण यासाठी कंपन्यांना खूप संघर्ष करावा लागत आहे.

कामगार मिळवण्यात येत आहेत अडचणी
राष्ट्रीय रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिलच्या महाराष्ट्र युनिटचे अध्यक्ष राजन बांदेलकर म्हणाले की, कामगार टंचाईमुळे बांधकाम प्रकल्पांवर परिणाम झाला आहे, जो आता पूर्ण होण्यासाठी वेळ लागेल. त्याचबरोबर मुंबईतील एका फार्मा कंपनीने गेल्या तीन महिन्यांत कामगारांच्या बऱ्याच समस्यांचा सामना केला आहे. त्यानंतर ते आपल्या कर्मचार्‍यांना ये-जा करण्यासाठी बसची सुविधाही देत आहेत. केईसी इंटरनॅशनलचे एमडी आणि सीईओ विमल केजरीवाल म्हणतात की, त्यांच्या कंपनीचे सुमारे दोन तृतीयांश कामगार परत आले आहेत. ते म्हणतात की, कंपनीच्या वतीने कामगार कुटुंबे आणि ग्रामीण सरपंचांना कामगारांच्या संरक्षणाचे आश्वासन दिले जात आहे. केजरीवाल म्हणतात की, काही भागात कामगारांना विमानानेही परत आणले जात आहे.

कामगारांना या सुविधा देत आहेत कंपन्या?

  • कामगारांना परत आणण्यासाठी कंपन्या बस व ट्रेनच्या पुढे जाऊन फ्लाइटमधूनही परत आणत आहेत.
  • कंपन्यांच्या वतीने कामगारांना त्यांच्या राहण्यासह सर्व प्रकारच्या सुविधा पुरवल्या जात आहेत.
  • कामगारांना परत आणण्यासाठी कंपन्या दोन्ही ठिकाणच्या अधिकाऱ्यांची परवानगी घेत आहेत.