धक्कादायक ! एकतर्फी प्रेमातून भारतीय तरुणीची ऑस्ट्रेलियात हत्या

अ‍ॅडिलेड : वृत्तसंस्था –   एकतर्फी प्रेमातून भारतीय तरुणीची ऑस्ट्रेलियामध्ये हत्या केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे संशयित आरोपीही भारतीय आहे. तरुणीच्या हत्येनंतर आरोपीने तिचा मृतदेह शहरापासून 400 किमी दूर नेवून पुरला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीसह त्याच्या काका आणि मावशीला अटक केली आहे. चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

जस्मीन असे मृत तरुणीचे नाव असून ती मुळची पंजाबमधील नारायणगड (जि. संगरुर) येथील राहणारी आहे. तर तारिकज्योत सिंह असे आरोपीचे नाव असून तो लुधियानाजवळील एका गावातील रहिवासी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जस्मीन अडीच वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात नर्सिंगच्या कोर्ससाठी गेली होती. यावेळी ती अ‍ॅडिलेडमध्ये पार्ट टाइम नोकरीही करत होती. ती ज्याठिकाणी नोकरीला होती, ते दाम्पत्य संबंधित आरोपीचे काका आणि मावशी होते. आरोपीही त्याच ठिकाणी नोकरीला होता. या दरम्यान आरोपीने तिची अनेकदा छेड काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मृत जस्मीनने याबाबतची तक्रार पोलिसांना दिली होती. शिवाय तारिक त्रास देत असल्याची माहिती तिने आपल्या घरच्यांनाही दिल्याची माहिती जास्मीनच्या मामाने दिली आहे. घरी तक्रार दिल्यानंतर आरोपीने तिला त्रास द्यायचे थांबवले नाही. दरम्यान जस्मीन अचानक गायब झाली. तिच्याशी काही संपर्कही होत नव्हता. त्यामुळे जस्मीनच्या नातेवाईकांनी तिच्या सहकाऱ्याद्वारे ऑस्ट्रेलियन पोलिसांत तक्रार दाखल करण्यास सांगितले. तसेच तिच्या गायब होण्यामागे तारिकचा हात असू शकतो, असा संशयही होता. यानंतर पोलिसांनी आरोपी तारिकसोबतच त्याचा काका आणि मावशीलाही अटक केली आहे.