सावधान ! ऑगस्टपर्यंत भारतात ‘कोरोना’ रुग्णांची संख्या 10 लाखावर जाऊ शकते

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  देशात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात झाला असून देशातील कोरनाबाधित रुग्णांची संख्या 95 हजारावर पोहचली आहे. तर मृतांची संख्या 3 हजारावर पोहचली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. आतार्पंत लॉकडाऊनचे तीन टप्पे पूर्ण झाले असून लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याला सोमवार (दि.18) पासून सुरुवात झाली आहे. गेल्या 24 तासामध्ये 5 हजार नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे.

कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून पुढचे दोन महिने भारतासाठी अतिशय महत्त्वाचे असून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संभाव्य आकडे लक्षात घेऊन सरकारने तयारी सुरु केली आहे. जुलैपर्यंत तब्बल 1 कोटी लोकांच्या टेस्ट करण्याचे टार्गेट आखण्यात आले आहे.

देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने त्याच प्रमाणात सरकारने तयारी सुरु केली आहे. आतापर्यंतचा आलेख लक्षात घेता काही मॉडेल्सवर तज्ज्ञ काम करत आहेत. त्यांच्या मतानुसार जुलै महिन्यात 5 ते 7 लाख नवे रुग्ण येऊ शकतात. तर ऑगस्टमध्ये हाच आकडा 10 लाखापर्यंत जाऊ शकतो. ही वाढ लक्षात घेता सरकारने तयारी सुरु केली आहे. एवढ्या बेड्सची उपलब्धता, त्यांच्यासाठी लागणारी उपकरणं, मनुष्यबळ, त्यासाठी लागणारं प्रशिक्षण अशा सर्व गोष्टींची तयारी करण्याच्या सूचना राज्य सरकारला देण्यात आल्या आहेत.

देशात 20 मोठ्या शहरांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये या शहरांवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. त्या शहरांमध्ये मुंबई, दिल्ली, भोपाळ, इंदूर आणि चेन्नईचा समावेश आहे. रुग्णांचं ट्रेसिंग करण्यासाठी टेस्टची संख्या वाढविण्यात येणार आहे. मुंबई सारख्या शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात टेस्ट करण्यात येणार असल्याची माहिती दिली जात आहे.