लडाखमध्ये भारतीय जवानांना ताब्यात घेण्यापर्यंत चीनची मजल ?

पोलिसनामा ऑनलाईन – लडाख  नियंत्रण रेषेजवळ भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये मोठया प्रमाणात तणाव आहे. नियंत्रण रेषेजवळ पहारा देणार्‍या भारतीय लष्कर आणि इंडो तिबेटीयन बॉडर्र पोलिसांच्या गस्ती पथकाला ताब्यात घेण्यापर्यंत चीनची मजल गेली आहे. भारतीय जवानांना ताब्यात घेतल्यानंतर काही वेळाने त्यांना सोडून देण्यात आले.

भारतीय जवानांना ताब्यात घेतल्यानंतर मोठया प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. पण दोन्ही बाजूच्या कमांडर्समध्ये बैठक झाल्यानंतर परिस्थिती सामान्य झाली. पँगगाँग तलावाजवळ घडलेल्या घटनाक्रमाची पंतप्रधान कार्यालयाला सविस्तर माहिती देण्यात आली आहे. मागच्या आठवडयात बुधवारी भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये धक्काबुक्की झाल्यानंतर भारतीय जवानांना ताब्यात घेतले. त्यानंतर परिस्थिती स्फोटक बनली होती. पण नंतर भारतीय जवानांना सोडून देण्यात आले असे एका अधिकार्‍याने सांगितले.

धक्काबुक्की होत असताना  जवानांची शस्त्रे सुद्धा काढून घेण्यात आली होती. पण नंतर जवानांना सोडण्यात आले व त्यांची शस्त्रे परत केली आहेत. दरम्यान, वर्चस्व गाजवण्याची चीनची जुनी खोड आहे. त्यामुळे सध्या लडाखमध्ये तणाव निर्माण झाला आहे. चीनकडून होणार्‍या घुसखोरीच्या घटनांवर नजर टाकली तर त्यामध्ये एक समान पॅटर्न दिसून येतो. भारत आणि चीनमध्ये लडाख ते अरुणाचल प्रदेशपर्यंत 3 हजार 488 किलोमीटरपर्यंत सीमारेषा आहे. 2015 पासून चीनने भारतीय हद्दीत केलेल्या घुसखोरीच्या घटनांवर नजर टाकली तर 80 टक्के घुसखोरीच्या घटना या चार भागांपुरता मर्यादीत आहेत. यातले तीन भाग हे पश्चिम सेक्टरमध्ये येणार्‍या पूर्व लडाखमधले आहेत. घुसखोरीच्या एकूण घटनांपैकी ट्रिग हाइटस आणि बुर्त्से या लडाखमधील दोन भागांमध्ये चीनकडून घुसखोरीच्या दोन तृतीयांश घटना घडल्या आहेत.