नेपाळ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका भारतीयाचा मृत्यू, एक बेपत्ता

पीलीभीत : वृत्तसंस्था – नेपाळ पोलिसांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला उत्तर प्रदेश पोलिसांकडून दुजोरा देण्यात आला आहे.

काय आहे नेमका प्रकार
उत्तर प्रदेशला लागून असलेल्या भारत – नेपाळ सीमेवर भारतीय नागरिक आणि नेपाळ पोलिसांमध्ये हाणामारी झाली होती. या हाणामारीत नेपाळ पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एका युवकाला गोळी लागल्याने तो जखमी झाला. त्याला उपचारासाठी उत्तर प्रदेशच्या पीलीभीतमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्याचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव गोविंदा आहे. तो २६ वर्षांचा होता. गविंदा हा आपले मित्र पप्पू सिंह आणि गुरमीत सिंह यांच्यासोबत नेपाळमध्ये गेला होता.

नेमके त्या ठिकाणी काय घडले?
तीन भारतीय नागरिक नेपाळला गेले होते. त्या ठिकाणी काही कारणावरून त्यांची नेपाळ पोलिसांसोबत बाचाबाची झाली. या बाचाबाचीवरून नेपाळ पोलिसांकडून भारतीय नागरिकांवर गोळी झाडण्यात आली. त्यामधील एकाला गोळी लागल्याने त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या एका साथीदाराने नेपाळ पोलिसांसोबत झालेल्या झटापटीतच सीमा पार केल्याने त्याचा जीव वाचला तर त्यांचा तिसरा साथीदार अजूनही बेपत्ता आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.