12 वी पास उमेदवारांसाठी भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी ! तब्बल 2500 जागांसाठी जम्बो भरती, जाणून घ्या प्रक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाऊनमुळे सगळीकडेच नोकऱ्यांवर संक्रांत आली आहे. त्यामुळे लाखो तरुण नव्या नोकरीच्या आणि संधीच्या शोधात आहेत. अशा परिस्थितीत सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणा-यांसाठी भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. नौदलात सेलर पदाच्या 2500 जागांसाठी भरती केली जात आहे. यासाठी अर्ज करण्याची सुरुवात 26 एप्रिल पासून होत असून शेवटची तारीख 30 एप्रिल 2021 आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांना joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन अर्ज करता येईल.

या भरती प्रक्रियेत 12 वी सायन्स उत्तीर्ण तरुणांसाठी चांगली संधी आहे. एकूण 2500 पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत असून यात आर्टिफिशर अ‍ॅप्रेंटिस सेलर या पदासाठी 500, तर सिनिअरी सेकंडरी रिक्रुएटर पदासाठी 2000 पदांचा समावेश आहे. दरवर्षी भारतीय नौसेनेकडून या पदासाठी भरती प्रक्रिया पार पडत असते.

पात्रता

यासाठी इच्छूक उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डातून गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र किंवा कम्प्युटर सायन्स या विषयांसह कमीत कमी 60 टक्के गुणांसह 12 वी पास असावा. उमेदवाराचा जन्म हा 1 फेब्रुवारी 2001 ते 31 जुलै 2004 या कालवधीत झालेला असावा.

निवड प्रक्रियाः

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची लेखी परीक्षा होईल. त्यानंतर फिजिकल टेस्ट आणि मेडिकल टेस्टच्या आधारावर निवड होणार आहे. भारतीय नौसेनेद्वारे घेतल्या जाणा-या या परीक्षेचे लेखी आयोजन देशभरातील विविध 31 परीक्षा केंद्रावर केले जाते. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर पात्र उमेदवारांना फिजिकल टेस्टसाठी बोलावण्यात येते. त्यानंतर या टेस्टमध्ये पास झाल्यास मेडिकल टेस्ट घेतली जाते.