फायबरपासून बनवलेला पारदर्शक सिलेंडर येतोय बाजारात; इंडियन ऑईलकडून लाँच

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – इंडियन ऑईल कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी हलक्या वजनाचा सिलेंडर लाँच केला आहे. हा सिलेंडर हलक्या वजनाचा आणि रंगीत असा असणार आहे. हा छोटा सिलेंडर इतर ठिकाणी नेताही येऊ शकणार आहे. हलक्या वजनाचा हा सिलेंडर किती शिल्लक आहे हेदेखील समजणार आहे.

मॉड्यूलर किचनसाठी हे सिलेंडर डिझाईन करण्यात आले आहे. हा सिलेंडर फायबरपासून बनवण्यात आला आहे. सध्या हा सिलेंडर 5 आणि 10 किलोच्या आकारात उपलब्ध करून देण्यात आला आहे. सध्या वापरात असलेल्या गॅस सिलेंडर्सपेक्षा हे सिलेंडर वजनाला किमान 50 टक्के हलके असतील. मॉड्यूलर किचनला शोभणारे हे सिलेंडर खास डिझाईन करण्यात आले असून, हे नवीन प्रकारचे सिलेंडर सध्या हैदराबाद आणि दिल्लीमध्ये उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी आपण आपल्या जवळच्या इंडेन वितरकाशी संपर्क साधावा, असे कंपनीने या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, सध्या घरगुती एलपीजी सिलेंडर 14.2 वजनासह लोखंडी टाकीतून मिळतो. हा सिलेंडर पूर्णत: लोखंडी आहे. मात्र, आता 5 आणि 10 किलोचा तयार होणारा सिलेंडर फायबरपासून बनवला जाणार आहे. हे देशात पहिल्यांदाच होत आहे.

काय आहेत वैशिष्ट्ये?

– वजनाला खूप हलके आणि रंगीबेरंगी

– फायबरपासून बनवलेले हे सिलेंडर सुरक्षित

– सिलेंडरचा काही भाग पारदर्शक

– ग्राहकांना सिलेंडरमध्ये किती गॅस उरला हे सहज समजणार

– वजनाला किमान 50 टक्के हलके

– फायबरपासून बनवलेल्या या सिलेंडरमध्ये जास्तीत जास्त 10 किलो गॅस