IOCL नं लॉन्च केलं देशातील पहिलं 100 ऑक्टेन प्रीमियम पेट्रोल; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रीमियम पेट्रोलच्या जगात भारत आज एका नव्या शिखरावर पोहाेचला आहे. देशातील सर्वांत मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑयलने जागतिक दर्जाचे प्रीमियम पेट्रोल बाजारात आणले आहे. या प्रीमियम पेट्रोलला XP100 (100 Octane) पेट्रोल म्हणतात. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशातील 10 शहरांसाठी हे प्रीमियम पेट्रोल बाजारात आणले आहे. या कामगिरीमुळे भारत जगातील अशा काही देशांपैकी एक बनला आहे, जो प्रीमियम पेट्रोलच्या या पातळीचा वापर करीत आहे.

केवळ 6 देशांमध्ये होत आहे वापर
भारतात या प्रीमियम पेट्रोलशिवाय यूएसए आणि जर्मनीसह जगात फक्त 6 देश आहेत, जे याचा वापर करतात. हे जागतिक दर्जाचे पेट्रोल लॉन्च झाल्यानंतर लक्झरी मोटारी व महागड्या बाईकसाठी जर्मनी आणि अमेरिकेत आढळणारे खास पेट्रोल आता भारतातही उपलब्ध झाले आहे. भारतात त्याची किंमत प्रतिलिटर सुमारे दीडशे रुपये सांगितली जात आहे. दिल्ली आणि नोएडामध्ये प्रतिलिटर 160 रुपये किंमत आहे.

एक्सपी 100 प्रीमियम पेट्रोलचा वापर केल्यास हे फायदे मिळतील
हे प्रीमियम पेट्रोल अल्ट्रा मॉडर्न आणि अल्ट्रा प्रीमियम उत्पादन आहे. हे पेट्रोल वाहनांमध्ये उच्च पातळीची शक्ती आणि कामगिरी करण्यास सक्षम आहे. हे पेट्रोल लक्झरी कार आणि दुचाकीस्वारांच्या कामगिरीत आणखी सुधारणा करेल. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंडियन ऑइलने आपल्या मथुरा रिफायनरीमध्ये स्वदेशी ओक्टामॅक्स तंत्रज्ञानाचा वापर करून हे विकसित केले आहे. ऑक्टेन 100 च्या वापरामुळे वाहनांच्या इंजिनची कार्यक्षमता आणि वेग वाढेल.

एक्सपी 100 पेट्रोल वापरल्याने वाहनचालकांना मोठा अनुभव मिळेल. इतकेच नव्हे तर इंधन वाचविण्यात मदत होईल, तसेच वाहनांच्या इंजिनचे आयुष्यही मोठ्या प्रमाणात वाढेल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ते पर्यावरणास अनुकूल इंधन आहे. या पेट्रोलच्या वापरामुळे कमीतकमी प्रदूषण उत्सर्जन होईल, असा कंपनीचा दावा आहे.

या शहरांमध्ये 1 डिसेंबरपासून एक्सपी 100 पेट्रोलची विक्री होईल
इंडियन ऑईलने बनवलेल्या योजनेनुसार, हे प्रीमियम ग्रेड पेट्रोल दोन टप्प्यात 15 शहरांमध्ये विकले जाईल. पहिल्या टप्प्यात 1 डिसेंबरपासून दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, आग्रा, जयपूर, चंदीगड, लुधियाना, मुंबई, पुणे आणि अहमदाबाद येथे विक्रीची योजना आहे. दुसर्‍या टप्प्यात हे पेट्रोल चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता आणि भुवनेश्वरमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, सध्या इंडियन ऑईल ऑक्टेन 91 पेट्रोल विक्री आणि मार्केटिंग करत आहे.