… म्हणून हा भारतीय वंशाचा मुलगा ठरला सर्वात हुशार 

लंडन : वृत्तसंस्था – ब्रिटनमधील भारतीय वंशाचा आरव अजयकुमार हा आठ वर्षांचा मुलगा आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेने प्रसिद्ध झाला आहे. या वयात त्याचा बुद्ध्यांक (आयक्यू) १५२ आहे. यामुळे त्याचा  ब्रिटनमधील सर्वाधिक आयक्यू असलेल्या लोकांमध्ये समावेश झाला. आणि यामुळेच त्याचा सर्वात बुद्धिमंतांमध्ये ही समावेश झाला आहे. त्याने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षीच बुद्ध्यांक चाचणीची मेन्सा टेस्टमध्ये भाग घेतला होता व आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली होती.

लिसेस्टरमध्ये राहणार्‍या आरव अजयकुमार याचे आई-वडील २००९ मध्ये मुंबईतून ब्रिटनमध्ये आले होते. आरवला मॅथेमॅटिकल असोसिएशनकडून आयोजित लॉजिकल रिझनिंंग टेस्टमध्येही सुवर्णपदक मिळाले होते. तो दोन वर्षांच्या वयातच एक हजारपर्यंतचे अंक म्हणू शकत होता.

त्याने सांगितले, मला गणित विषय अतिशय आवडतो. याचे कारण म्हणजे त्यामध्ये एकच अचूक उत्तर असते व त्याला पर्याय नसतो ! मी मेन्सा टेस्ट दिली त्यावेळी थोडा नर्व्हस होतो. मात्र, त्यामधील सर्व प्रश्‍न मला सोपेच वाटले. गणिताशिवाय मला बुद्धिबळ खेळणे आणि सायकल चालवणे आवडते. भविष्यात चेस ग्रँडमास्टर बनण्याची माझी इच्छा आहे, असेही त्याने सांगितले. आरव लिसेस्टरशायर कौंटी चेस टीममध्ये अंडर-९ गटात बुद्धिबळ खेळतो.