US : भारतीय वंशाच्या कमला हॅरिस उपाध्यक्षपदाच्या उमेदवार, जो बिडेन यांच्याकडून घोषणा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन यांनी कमला हॅरिस यांची उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून निवड झाल्याची घोषणा केली आहे, डेमोक्रॅटिक अध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन यांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिली आहे, कमला हॅरिस भारतीय वंशाच्या आहेत आणि या पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला असणार आहेत.

महत्त्वाचे म्हणजे कॅलिफोर्नियाच्या खासदार असलेल्या कमला हॅरिस एकेकाळी जो बिडेन यांना अध्यक्षपदासाठी आव्हान देत होत्या, तर बिडेन यांनी त्यांची आता उपाध्यक्षपदासाठी निवड केली आहे, यामुळे अमेरिकेतील निवडणुक रोचक होईल.

जो बिडेन यांनी ट्वीट करून असे लिहिले की हे सांगताना मला अभिमान वाटत आहे की कमला हॅरिस यांना उपाध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी निवडले आहे. बिडेन यांनी त्यांना एक शूर योद्धा आणि अमेरिकेतील एक उत्कृष्ट नोकरशहांपैकी एक म्हटले आहे.

उपाध्यक्षपदाच्या उमेदवार बनल्यानंतर कमला हॅरिस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, जो बिडेन अमेरिकन लोकांना एकत्र करू शकतात, कारण त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आपल्यासाठी लढण्यात व्यतीत केले. अध्यक्ष म्हणून ते अशी एक अमेरिका निर्माण करतील जी आपल्या आदर्शांनी परिपूर्ण असेल आणि माझ्या पक्षाच्या वतीने उपाध्यक्षपदाची उमेदवार म्हणून मी त्यांच्यात सामील झाल्याचा मला अभिमान वाटतो.