‘गगनयान’चं स्वप्न साकार करण्यासाठी घनदाट जंगलात आणि कडाक्याच्या थंडीत भारतीय वैमानिकांचं ‘खडतर’ प्रशिक्षण

मॉस्को : वृत्त संस्था – भारताचे महत्वकांक्षी मानव मिशन यशस्वी करण्यासाठी हवाईदलाचे चार बहाद्दुर वैमानिक रशियातील कडाक्याच्या थंडीत आणि हिमाच्छादित परिसरात कठोर प्रशिक्षण घेत आहेत. मॉस्को येथील गागरीन रिसर्च अँड टेस्ट कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये सुरू असलेल्या या प्रशिक्षणात हे वैमानिक समुद्राच्या आत रहाणे आणि जंगलात जोखीम घेण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. तसेच अधुनिक इंजिनियरिंगचा अभ्यास करत आहेत. पाच वर्षांचे प्रशिक्षण एक वर्षात पूर्ण करण्याचे उद्दीष्ट घेऊन काम करत असलेल्या या वैमानिकांना अनेकदा आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे.

रशिया टुडे टीव्ही चॅनलच्या वृत्तानुसार, दिवस-रात्र आपले उद्दीष्ट साध्य करण्यासाठी कार्यरत भारतीय पायलट रशियन यान सोयुजमध्ये रशियन भाषेत प्रशिक्षण घेत आहेत. यासाठी त्यांना रशियन भाषाही शिकवली जात आहे. मॉस्कोच्या जंगलात ते भयंकर जंगली जनावरांशी कसे लढायचे हे शिकत आहेत तर अवकाशातून परतताना कोणतीही गडबड झाली तर त्या स्थितीत जिवंत राहण्याचे धडेही घेत आहेत.

त्यांना तीन दिवस आणि दोन रात्र जिवंत राहण्यासाठी कठोर प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यांना भयंकर अशा दरीत आणि खोल समुद्रातही प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणानंतर या वैमानिकांना एक आठवड्याची सुट्टी दिली जाईल, जेणेकरून ते ठिक व्हावेत. ट्रेनिंग सेंटरचे प्रमुख पॉवेल व्लेसोव्ह यांनी म्हटले की, मला पूर्ण विश्वास आहे की, भारतीय हवाई दलाचे वैमानिक या अंतराळातील आव्हानांना तोंड देत पुढे जातील आणि यश मिळवतील.

भारतीय वैमानिकांना रशियन भाषेसोबतच रशियन खाद्यपदार्थसुद्धा एक आव्हानच झाले आहे. ट्रेनिंग सेंटरमध्ये वैमानिकांना त्यांच्या आवडीनुसार जेवण तयार केले जात आहे. त्यांना शाकाहारी जेवणसुद्धा दिले आहे. धार्मिक भावना जपण्यासाठी जेवणातून बीफ वगळण्यात आले आहे.

गगनयानसाठी 2022 च्या पहिल्या महिन्याचे लक्ष्य ठरविण्यात आले आहे. यासाठी 10,000 करोड रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मिशननुसार तीन सदस्यीय क्रू सात दिवसाच्या अंतराळ यात्रेवर जाईल. अंतराळात मानवी मिशन पाठवणारा भारत जगातील चौथा देश होणार आहे. इस्त्रो प्रमुख सिवन यांनी घोषणा केली होती की, 2022 पर्यंत गगनयान पाठवले जाईल. यापूर्वी इस्त्रो 2020 आणि 2021 मध्ये दोन मानव रहित मिशन पाठवणार आहे.