आता रेल्वेसोबत व्यवसाय करण्याची सुवर्ण संधी, ‘हे’ व्यवसाय सुरू करा अन् कमवा भरघोस पैसे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  कोरोनामुळे अनेकांना नोक-या गमवाव्या लागल्या तर काहीचे उद्योग, व्यवसाय बंद पडले आहेत. अशा परिस्थितीत आपण एखादा व्यवसाय सुरु करण्याच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. भारतीय रेल्वे प्रशासनाने (Indian Railway) व्यवसायाची एक सुवर्णसंधी घेऊन आली आहे. रेल्वे मंत्रालयाने गुड्स शेड डेव्हलपमेंट पॉलिसी दाखल केली आहे. याद्वारे लहान मोठ्या व्यावसायिकांना छोट्या रेल्वेस्थानकांवर चहा-कॉफीचे स्टॉल, खाद्यपदार्थांचे स्टॉल, कँटीन (Canteen) सुरू करता येणार आहेत. रेल्वेच्या या योजनेत गुंतवणूक करूनही चांगले उत्पन्न मिळवता येणार आहे.

रेल्वेच्या गुड्स शेड डेव्हलपमेंट पॉलिसीअंतर्गत नवीन गुड्स शेड निर्माण करण्यात येणार आहेत. खासगी गुंतवणूकदारांच्या मदतीने जुन्या गुड्स शेड्सचा कायापालट करण्यात येणार आहे. याशिवाय सध्याच्या गुड्स शेड्सचा विकास करून टर्मिनलची क्षमता वाढविण्याचीही योजना आहे.

कशी करता येईल कमाई?

समजा तुम्ही एक व्यावसायिक आहात आणि तुम्ही जर रेल्वेच्या गुड्स शेड्स डेव्हलपमेंट योजनेत पैसे गुंतवलेत, तर तुम्हाला रेल्वे स्टेशनच्या आसपास असलेल्या छोट्या दुकानांमध्ये, कँटीनमध्ये तुमच्या व्यवसायाची जाहिरात पत्रक लावण्याची परवानगी दिली जाईल. यामुळे तुमच्या व्यवसायाची मोफत जाहिरात होईल आणि तुमचा व्यवसाय वाढून उत्पन्नही वाढेल.

खासगी व्यावसायिकांना ही विकासकामे करावी लागतील :

या योजनेत सहभागी झालेल्या खासगी व्यावसायिकांना सामान चढवणे, उतरवण्याची सुविधा उपलब्ध करणे, मजुरांसाठी सुविधा, जोडरस्ता, शेडवर कव्हर, अन्य पायाभूत सुविधा विकसित करण्यास परवानगी दिली जाईल. रेल्वेने मान्यता दिलेल्या डिझाईन्सप्रमाणेच ही कामे होणं अपेक्षित आहे. रेल्वे यासाठी खासगी गुंतवणूकदारांकडून कोणतेही शुल्क आकारणार नाही. सर्व जनतेसाठी या सुविधांचा उपयोग करण्यात येणार आहे.

ई-तिकीट द्वारेही कमाईची संधी

रेल्वेच्या कमाईचा मोठा हिस्सा हा ई-तिकीटावरील (E-Ticketing) सेवा करातून (Service Tax) मिळतो. मात्र नोटबंदीनंतर तीन वर्षापर्यंत रेल्वेला या कमाईची संधी सोडावी लागली होती. सरकारने डिजिटल व्यवहारांना (Digital Transactions) प्रोत्साहन देण्यासाठी सेवा कर आकारणी बंद केली होती.