फायद्याची गोष्ट ! रेल्वे स्टेशनवर फक्त 50 रूपयांमध्ये होणार ‘या’ 16 वैद्यकीय तपासण्या, केवळ 10 मिनीटांमध्ये मिळणार रिपोर्ट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता रेल्वे स्थानकांवर लोक अवघ्या पन्नास रुपयांमध्ये आरोग्यासंबंधी 16 वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या करू शकणार आहेत. विशेष म्हणजे त्यानंतर येणाऱ्या रिपोर्टसाठी जास्त वेळ थांबावे लागणार नाही अवघ्या 10 मिनिटात याबाबतचा रिपोर्ट दिला जाणार आहे. जर एखाद्याला तो रिपोर्ट घ्यायला सुद्धा वेळ नसेल तर रिपोर्ट इ मेल द्वारे पाठवण्याची देखील सोय उपलब्ध आहे.

12 लाखांपेक्षा अधिक रेल्वे कर्मचारी आणि कोट्यवधी प्रवाश्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी तपासणी करणारी मशिन्स सर्व रेल्वे स्थानकांवर लावण्यात आलेली आहे. कंपनीने सांगितले आहे की लवकरच ते या ठिकाणी डायबिटीजची सुद्धा तपासणी सुरु करणार आहेत मात्र त्यासाठी वेगळे शुल्क आकारले जाईल.

काय काय तपासले जाणार –
यामध्ये हाडांची तपासणी, बॉडी मास इंडेक्स, ब्लड प्रेशर, मेटाबॉलिक एज, फॅट, हाईड्रेशन आदींबाबत तपासणी होऊन रिपोर्ट मिळू शकणार आहे. त्याचप्रमाणे यामध्ये पल्स रेट, हाइट मसल मास, शरीराचे तापमान, शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण आणि वजन याबाबतची माहिती देखील तपासून मिळणार आहे. या मशीन लावलेल्या कंपनीने सांगितले आहे की, या सर्व तपासण्या करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे ब्लड सँपल द्यावे लागणार नाही.

दिल्ली आणि लखनौमध्ये सुरुवात, बाकी स्थानकांवर लवकरच होणार सुरु –
दिल्ली आणि लखनौमधील रेल्वे स्थानकांवर याबाबतच्या मशीन लावण्यात आलेल्या आहेत. रेल्वे बोर्डाचे अद्यक्ष विनोद यादव यांनी लखनौच्या रेल्वे स्थानकावर या मशीनचे उदघाटन केले आहे आणि दिल्ली येथे देखील सोमवारी मशीन लावण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार बाकीच्या महत्वाच्या स्थानकांवर देखील या मशीन लावण्यात येणार आहेत त्याचे काम पुढील एक महिन्यात पूर्ण होईल.

उत्तर रेल्वेचे सीपीआरओ दीपक कुमार यांनी सांगितले की, प्रवाशांना प्रवासावेळी सुरक्षा तसेच स्थानकांवर आवश्यक मेडिकल सुविधा उपलब्ध करून देण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे. या मशीनला देशाच्या सर्व महत्वाच्या आणि मोठ्या रेल्वे स्थानकांवर लावण्यात येणार आहे.

महाराष्ट्रासह इतर राज्यात लवकरच ही सुविधा –

दिल्ली आणि लखनौ येथे ही सुविधा सुरू केल्यानंतर महाराष्ट्रासह इतर राज्यातील महत्वाच्या रेल्वे स्टेशनवर ही सुविधा चालू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतीत रेल्वे प्रशासनाकडून अधिकृतपणे तारीख सांगण्यात आली नाही मात्र रेल्वेच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशभरातील सर्वच महत्वाच्या रेल्वे स्टेशनवर ही सुविधा देण्यात येणार आहे.

Visit : Policenama.com