खुशखबर ! आता ऑनलाईन पाहता येणार रेल्वे आरक्षणाची यादी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या आधुनिक निर्णयामुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या भारतीय रेल्वेने आता आणखी एक लोकप्रिय निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने आरक्षित तिकीटाची यादी ऑनलाईन पाहण्याची नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

रेल्वे या नवीन सेवेद्वारे प्रवाशांना गाडीतील डब्याचे ग्राफिकल प्रेझेंटेशन आणि बर्थ नुसार तपशील मिळणार आहेत. या नवीन सुविधेसाठी रेल्वेच्या http://www.irctc.co.in या संकेत स्थळावर CHARTS / VACANCY असा नवीन पर्याय सुरु करण्यात आला आहे. या नुसार आरक्षित असणाऱ्या जागा आणि शिल्लक असणाऱ्या जागा वेगवेगळ्या रंगाच्या सहाय्याने दाखवल्या जाणार आहेत. ‘मोबाईल इंटरनेटवर देखील हि नवीन सेवा प्रणाली उपलब्ध करून दिली असल्याने रेल्वे तिकीट आरक्षणात पारदर्शकता येईल’ असा विश्वास केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे.

आगामी २० दिवसांमध्ये हि सुविधा शताब्दी आणि राजधानी गाड्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. उपलब्ध आसनांची संख्या ऑनलाईन उपलब्ध करून दिल्यामुळे तिकीट तपासणीसाला शोधण्याची आवश्यकता पडणार नाही. तसेच येत्या काही महिन्यात हि प्रणाली सर्व रेल्वे गाड्यांना सुरु करण्यात येईल असे देखील रेल्वे विभागाच्या वतीने सांगण्यात येते आहे.