प्रवाशांसाठी खुशखबर ! आता रेल्वेचा प्रवास होणार मनोरंजक, याच महिन्यात सुरू होतेय ‘ही’ नवीन सेवा

पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय रेल्वेचा प्रवास अधिक मनोरंजक करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने चालू महिन्यापासून कंटेंट ऑन डिमांड (COD) सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्याअंतर्गत विविध भाषांमध्ये चित्रपट, बातम्या, संगीत व्हिडिओ आदी अपलोड करता येणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. 5 हजार 723 उपनगरी रेल्वेसह 8 हजार 731 ट्रेन आणि वाय-फाय असणाऱ्या 5 हजार 952 रेल्वे स्थानकांवर ही सेवा सुरु होणार आहे. भारतीय रेल्वेचे पीएसयू रेलटेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरूवारी (दि. 4) याबाबतची माहिती दिली.

चालू महिन्यापासून ही बहुप्रतिक्षित सेवा सुरु होत असल्याने प्रवाशांना मनोरंजनासाठी नवीन सुविधा मिळणार आहे. या सेवेअंतर्गत रेल्वे प्रवासात प्रवाशांना त्यांच्या डिव्हाइसवर चित्रपट, बातम्या, म्युझिक व्हिडीओ आदी प्रीलोडेड बहुभाषिक कंटेट उपलब्ध करुन दिला जाईल. विशेष म्हणजे प्रवासात नेटवर्कमुळे स्ट्रीमिंग बफर होऊ नये याकरिता रेल्वेच्या डब्यात मीडिया सर्व्हर ठेवले जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना धावत्या रेल्वेतही आपल्या डिव्हाइसमध्ये हाय क्वालिटी बफर फ्री स्ट्रीमिंगची सेवा मिळणार असल्याचे रेलटेलचे सीएमडी पुनीत पुनावाला यांनी सांगितले. 5 हजार 723 उपनगरी रेल्वेसह 8 हजार 731 ट्रेन आणि वाय-फाय असणाऱ्या 5 हजार 952 रेल्वे स्थानकांवर ही सेवा सुरु होणार आहे. पश्चिम रेल्वेमार्गावर एका राजधानी एक्सप्रेस आणि एका एसी लोकलमध्ये ही सुविधा अंतिम टप्प्यात असून चाचणी सुरू आहे. यामध्ये रेल्वे आणि रेलटेलमध्ये 50-50 टक्के महसूल विभागून घेतला जाणार आहे. पीएसयूला या प्रकल्पातून किमान 60 कोटींच्या वार्षिक उत्पन्नाची अपेक्षा आहे.