प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘…अन्यथा संपूर्ण भारतातील रेल्वे सेवा 2 तासासाठी थांबवणार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हळूहळू सर्वत्र अनलॉक होत आहे. अशात आता रेल्वे युनियन आणि रेल्वेसाठी काम करणाऱ्या मजुर आणि कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उगारण्याचा इशारा दिला आहे. गेल्या 46 वर्षातील हा सर्वात मोठा संप असणार आहे. 1974 च्या संपाची पुनरावृत्ती होणार का हे येत्या 21 ऑक्टोबर रोजी समजणार आहे. रेल्वे कर्मचारी आणि मजुरांना बोनस देण्याबाबत वारंवार मागणी होत आहे. मात्र अद्यापही याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. दिवाळीआधी हा निर्णय मार्गी लावण्याबाबत संघटना ठाम आहे.

रेल्वे प्रशासन आणि केंद्र सरकारनं जर 21 ऑक्टोबरपर्यंत निर्णय घेतला नाही तर संप करण्याचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारी हा संप करण्यात येणार असून 2 तास संपूर्ण रेल्वे सेवा ठप्प करण्यात येईल असा इशारा रेल्वे युनियनकडून देण्यात आला आहे. सरकारनं 21 ऑक्टोबरपर्यंत बोनस जाहीर केला नाही तर 22 ऑक्टोबरपासून रेल्वे कर्मचारी संपावर जात असल्याचं ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशन मंत्री शिवगोपाल मिश्रा यांनी स्पष्ट केलं आहे.

पूर्व मध्य रेल्वे कर्मचारी संघ धनबाद विभागाचे विभागीय मंत्री पीके पांडे यांनीही या संदर्भात सर्व प्रातांना अखिल भारतीय रेल्वे मेन्स फेडरेशनच्या आवाहनाचं पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. जर बोनस नसेल तर कोणतंही काम नाही. तसंच नाईट अलाऊंसमध्येही कपात होत असल्यानं कर्मचारी रात्रीच्या कामावर जाणार नाहीत असंही सांगण्यात आलं आहे. बोनस मिळाला नाही तर कर्मचारी कामावर जाणार नाहीत. त्यामुळं दिवाळीआधी रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस देण्याच्या मागणीनं जोर धरला आहे. आता प्रशासन याबाबत नेमका काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.