खुशखबर ! रेल्वेकडून 1 लाख 40 हजार रिक्त पदांसाठी डिसेंबरमध्ये परीक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   भारतीय रेल्वेकडून पदांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन केल्याने पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच पुढील तारखा देखील निश्चित करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे रेल्वेने तब्बल 1 लाख 40 हजार 640 रिक्त पदांसाठी लवकरच परीक्षा घेणार असल्याचे घोषित केले आहे. लवकरच या परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर केले जाणार आहे.

केंद्र सरकारच्या कोणत्याही सरकारी नोकरीवर बंदी किंवा रोख लावण्यात आलं नसल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात येणाऱ्या एसएससी, युपीएससी, रेल्वे भरती किंवा पोस्ट भरती यांसह इतर भरती प्रक्रिया पूर्वी प्रमाणेच राबवण्यात येणार आहेत. अर्थ विभागाने 4 सप्टेंबर रोजी काढलेले परिपत्रक हे पदांच्या निर्मितीसाठीच्या अंतर्गत भाग असून भरती प्रक्रियेशी त्याचा संबंध नसल्याचे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

कोरोना महामारीमुळे देशावर आर्थिक संकट कोसळले असून गेल्या तिमाहीत जीडीपीत मोठी घट झाल्याचे दिसून आले. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मंत्रालय आणि संबंधित विभागांना अवास्तव खर्च टाळण्याचे बजावले आहे. तसेच मंत्रालयीन विभागातील कामकाजासाठी कागदाचा अनावश्यक वापरही बंद करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, नोकर भरती थांबवण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केल्याने केंद्र सरकारला विविध विभागातील नोकर भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

डिसेंबरमध्ये परीक्षा

भारतीय रेल्वेकडून रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन पडल्याने या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. तसेच पुढील तारखाही निश्चित करण्यात आल्या नव्हत्या. त्यातच लॉकडाऊनमुळे सरकारी नोकरी होणार की नाही ? याबाबतही शंका निर्माण झाली होती. मात्र, रेल्वेने डिसेंबर महिन्यात परीक्षा घेण्यात येतील, असे सांगितले आहे.

या तारखेला होणार परीक्षा

रेल्वे डिसेंबरमध्ये परीक्षा घेण्याचे निश्चित केले असून या परीक्षा 15 डिसेंबर 2020 पासून घेण्यात येणार आहेत. रेल्वेच्या रिक्त जागांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. देशभरातील 1 लाख 40 हजार 640 जगांसाठी रेल्वेकडे तब्बल 2.42 कोटी अर्ज आले आहेत या अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून ही परीक्षा संगणीकृत असणार असल्याची माहिती आहे.

रेल्वेकडे तीन श्रेणींसाठी अर्ज प्राप्त

रेल्वेकडे तीन श्रेणींसाठी हे अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये एनटीपीसीसाठी (तांत्रिक नसलेल्या, गार्ड, लिपीक, क्लर्क) 35208 जागा रिक्त आहेत. तर 1663 जागा मंत्रालयीन स्तरावर आहेत. उर्वरीत 1 लाख 3 हजार 769 जागा ट्रॅकमन, सफाई, पॉईंटमन यासाठी आहेत.

लॉकडाऊन नियमानुसार परीक्षा

परीक्षा घेण्यासाठी विशेष सूचना व नियमावली तयार करण्यात आली आहे. कोरोना लॉकडाऊन, सामाजिक अंतर पालन करुनच या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.