2019-20 मध्ये विना तिकीट प्रवास करणार्‍यांकडून रेल्वेनं ‘कमवले’ 561 कोटी रूपये, एक कोटींहून अधिक जणांना दंड

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : 2019-20 मध्ये भारतीय रेल्वेने विना तिकीट प्रवास करणार्‍या दहा कोटी लोकांना दंड ठोठावला आहे. यामुळे रेल्वेला 561.73 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. अशाप्रकारे 2018-19 च्या तुलनेत त्यात सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. एका आरटीआय अर्जात ही माहिती समोर आली आहे. 2016 ते 2020 या काळात रेल्वेने तिकिटाशिवाय प्रवास करणार्‍या लोकांकडून दंड आकारून 1,938 कोटी रुपये कमावले आहेत.

मध्य प्रदेश बेस्ड आरटीआय कार्यकर्ते चंद्रशेखर गौड़ यांनी दाखल केलेल्या माहिती आरटीआईतून ही माहिती मिळाली आहे. रेल्वेला 2016-17 मध्ये तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून 405.30 कोटी रुपये दंड मिळाला. 2017-18 मध्ये रेल्वेला तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून 441.62 कोटी रुपये आणि 2018-19 मध्ये 530.06 कोटी रुपये दंड मिळाला. या व्यतिरिक्त 2019-20 मध्ये 1.10 कोटी प्रवासी तिकिटांशिवाय प्रवास करताना आढळले. भारतीय रेल्वेने विनातिकीट प्रवास रोखण्यासाठी निकष लावले आहेत.

तिकिटाशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशाला तिकिटाच्या किंमतीसह किमान 250 रुपये द्यावे लागतात. प्रवाश्याने पैसे देण्यास नकार दिल्यास प्रवाश्याला रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) ताब्यात दिले जाते आणि रेल्वे कायद्याच्या कलम 137 नुसार त्याच्यासोबत व्यवहार केला जातो. त्यानंतर त्या व्यक्तीला दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाते. दंडाधिकारी त्याच्यावर एक हजार रुपये दंड आकारू शकतात. जर त्या व्यक्तीने अद्याप दंड भरला नाही तर त्याला सहा महिन्यांपर्यंत तुरूंगात डांबले जाऊ शकते.

दरम्यान, 2018 मध्ये संसदेच्या रेल्वे अधिवेशन समितीने रेल्वेच्या 2016-17 च्या आर्थिक अहवालाचे मूल्यांकन केल्यानंतर विनातिकीट प्रवासामुळे होणारा महसूल तोट्याचा मुद्दा उपस्थित केला.