अभिमानास्पद ! भारतीय रेल्वेनं रचला इतिहास, ‘सोलार पावर’वर धावणार ट्रेन, जगात असं करणारा भारत पहिला देश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रेल्वेच्या रुळावर आता सौर उर्जा शक्तीने गाड्या धावतील. भारतीय रेल्वेने यासाठी तयारी पूर्ण केली आहे. वास्तविक रेल्वेने आपल्या पायलट प्रकल्पांतर्गत मध्य प्रदेशातील बीना येथे सौर उर्जा प्रकल्प सुरू केला असून त्यामुळे १.७ मेगा वॅट वीज निर्मिती होऊ शकते आणि या विजेने गाड्या चालवण्याची तयारी आहे.

रेल्वेचा असा दावा आहे की, जगातील इतिहासात ही पहिलीच वेळ आहे जेव्हा सौर ऊर्जेचा उपयोग गाड्या चालवण्यासाठी केला जाईल. या विद्युत केंद्राची खास बाब म्हणजे येथून २५ हजार व्होल्ट वीज निर्मिती केली जाईल, जी थेट रेल्वेच्या ओव्हरहेडवर हस्तांतरित केली जाईल आणि याच्या मदतीने गाड्या चालवल्या जातील.

BHEL ने केली मदत
मध्य प्रदेशच्या बीनामध्ये बीएचईएलच्या सहकार्याने रेल्वेच्या मोकळ्या जमिनीवर १.७ मेगावॅट क्षमतेचा सौर उर्जा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. संपूर्ण जगात असा वीज प्रकल्प नाही, ज्यामुळे ट्रेन चालवली जाऊ शकते. जगातील इतर रेल्वे नेटवर्क, मुख्यत: स्टेशन, निवासी वसाहती आणि कार्यालयांच्या विजेच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी सौर उर्जा वापरतात.

भारतीय रेल्वेने काही डब्यांच्या छतावर सौर उर्जा पॅनेल देखील बसवले आहेत, ज्यामुळे रेल्वेच्या डब्यात वीजपुरवठा होत आहे. पण आतापर्यंत कोणत्याही रेल्वे नेटवर्कने गाड्या चालवण्यासाठी सौरऊर्जेचा वापर केलेला नाही.

होणार २४.८२ लाख युनिट विजेचे उत्पादन
सौर प्रकल्पात डीसी उर्जा निर्माण होईल, जी एका इन्व्हर्टरद्वारे एसीमध्ये परावर्तित होईल आणि एका ट्रान्सफॉर्मरद्वारे २५केव्ही एसीची उर्जा ओव्हर हेडपर्यंत (गाड्यांवरील विद्युत तारा) प्रसारित करेल. या सौर प्रकल्पातून वर्षाला २४.८२ लाख युनिट वीज निर्मिती होईल. या प्रकल्पातून रेल्वेला वार्षिक वीज बिलात १.३७ कोटींची बचत अपेक्षित आहे.

३ गिगावॅटपर्यंत वाढणार क्षमता
रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एकूण ३ गिगावॅट क्षमतेचा सौर उर्जा प्रकल्प उभारण्याची योजना आहे. हे उर्जा प्रकल्प थेट इंजिनपर्यंत पोहोचतील. त्यांना तयार करण्याचे काम २-३ वर्षात पूर्ण होईल. यासाठी यापूर्वीच निविदा मागवण्यात आल्या आहेत.

या प्रकल्पाचा पाया गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ठेवण्यात आला होता. सध्या बीना सौर उर्जा केंद्राची विस्तृत चाचणी घेण्यात येत आहे.