दसरा अन् दिवाळीला घरी जाताना रेल्वेमध्ये ‘या’ नियमांचं उल्लंघन केल्यास होईल जेल, बसेल दंड, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वे एकापाठोपाठ एक नवीन गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेत आहे. या दरम्यान रेल्वेने सणांमध्ये 392 विशेष गाड्या सुरू करण्याचीही घोषणा केली आहे. एकीकडे रेल्वे प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन सतत निर्णय घेत आहे तर दुसरीकडे कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी काही नियमांचेही पालन करीत आहे. या अनुषंगाने सणांची वाढती मागणी लक्षात घेता रेल्वेने कडक प्रवासी नियम जारी केले आहेत. जर कोणी हे तोडले तर त्याला तुरुंगात जावे लागू शकते. तसेच, त्याला दंडही होऊ शकतो.

आरपीएफने उत्सव लक्षात घेऊन नियम जारी केले
कोविड -19 शी संबंधित मास्क व प्रोटोकॉलचे पालन केले नाही आणि तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्यानंतर रेल्वेने प्रवास केलेल्या प्रवाशांवर रेल्वे कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला जाऊ शकतो, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे. एवढेच नाही तर त्यांना दंडही होऊ शकतो. नियम मोडल्याबद्दल प्रवाश्याला शिक्षा होऊ शकते.

सणाच्या हंगामासाठी रेल्वे पोलिस दलाने (आरपीएफ) कडक मार्गदर्शक सूचना जारी केली आहेत. असे सांगितले जाते की, रेल्वेच्या परिसरात मास्क न घालणे किंवा मास्क व्यवस्थित न घातल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. त्याच वेळी, लोकांना सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करण्यास सांगितले गेले आहे.

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे देखील गुन्हा मानले जाईल
आरपीएफच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, एखाद्या व्यक्तीला संसर्ग झाल्याची पुष्ठी किंवा चाचणीचा अहवाल प्रलंबित असेल आणि त्या दरम्यान रेल्वे क्षेत्रात किंवा स्टेशनवर किंवा ट्रेनमध्ये चढून किंवा स्टेशनवर आरोग्य पथकाच्या वतीने प्रवास करण्यास मंजूरी नसेल तरीही जर तो ट्रेनमध्ये बसला तर त्याला तुरुंगात जावे लागू शकते. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी थुंकणे देखील गुन्हा मानले जाईल.

स्टेशन परिसर आणि गाड्यांमध्ये घाण पसरल्यास किंवा सार्वजनिक आरोग्य व सुरक्षिततेवर परिणाम करणारे उपक्रम राबविल्यास कठोर कारवाई केली जाईल. त्याचबरोबर कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्यासही कठोर कारवाई केली जाईल.

पाच वर्षापर्यंत तुरुंगवासाची आणि दंडाची शिक्षा होऊ शकते
रेल्वे पोलिस दलाने म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा प्रसार वाढविणार्‍या क्रिया एखाद्या व्यक्तीच्या सुरक्षेस धोका दर्शवू शकतात. त्यामुळे संबंधित व्यक्तीला रेल्वे कायद्याच्या कलम 145, 153 आणि 154 अंतर्गत शिक्षा होऊ शकते.

रेल्वे कायद्याच्या कलम 145 (मद्यधुंद होणे किंवा उपद्रव करणे)च्या अंतर्गत एक महिन्यापर्यंत तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते. त्याचबरोबर कलम -153 च्या अंतर्गत (प्रवाशांच्या सुरक्षिततेला मुद्दाम धोक्यात घालणे) दंड आणि पाच वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते. कलम 154 (निष्काळजीपणा करुन प्रवाशांच्या सुरक्षेला धोक्यात टाकणे.) अंतर्गत एक वर्षासाठी तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्हींची तरतूद आहे.