निवडक मार्गावर होणार रेल्वे तिकीट दरात वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वे प्रवासी भाड्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर रेल्वे विभागाने गांभीर्याने विचार करण्याचे ठरवले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृतानुसार रेल्वे विभाग सध्या असणारी पद्धत बदलून नवीन तिकीट दराची पध्द्त आणण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे काही मार्गावर प्रवास भाडे वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

हंगामी केंद्रीय अर्थमंत्री पियूष गोयल यांनी शुक्रवारी अंतरिम अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला.या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी ६४,५८७ कोटी रुपयांची वार्षिक घोषणा करण्यात आली आहे. रेल्वेवरील भांडवली गुंतवणूकही मोठ्या प्रमाणात आहे. सध्या भांडवली गुंतवणूक १.५८ लाख कोटी रुपयांवर गेली असल्याचेही पियुष गोयल यांनी त्याच दिवशी आपल्या भाषणात सांगितले आहे. याच सर्व कारणामुळे अर्थसंकल्पात रेल्वेसाठीची तरतूद २१ टक्क्यांनी वाढविण्यात आली आहे. एवढी पोषक पारिस्थिती असताना देखील रेल्वे तिकिटात वाढ होण्याची शक्यता आहे.

रेल्वेच्या सध्या करण्यात येणाऱ्या तिकीट दराच्या नियमावलीत रेल्वे गाडीची गती , रेल्वे गाडीचे स्वरुप आणि दिल्या जाणाऱ्या सेवा, जागेची उपलब्धता आणि सेवेची वर्गवारी यावर तिकिटाचे दर निर्धारित करण्यात येतात. मात्र या पारंपरिक निकषांना फाटा देत आता तिकीट दराच्या निकषासाठी नवीन नियमावली आणण्याच्या तयारीत रेल्वे विभाग आहे.