मार्च 2020 पर्यंत देशातील रस्त्यावर धावणार ड्रायव्हर’लेस’ कार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताच्या रस्त्यांवर लवकरच पहिली चालक विरहित कार धावणार आहे. यासाठी इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स म्हणजेच IISc आणि विप्रो यांनी भागीदारी करार केला आहे. दोन्ही कंपन्या पुढील वर्षी मार्चपर्यंत भारतात चालक विरहित कार आणणार आहे. या गाडीमुळे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अपघातांना देखील आळा बसणार आहे. त्याचबरोबर प्रवाशांच्या सुरक्षेत देखील वाढ होणार आहे.

तीन वर्षांपासून विप्रो करत आहे यावर काम

विप्रोच्या वतीने या चालकविरहित कारसाठी मागील तीन वर्षांपासून संशोधन केले जात आहे. यासाठी युरोप आणि अमेरिकेच्या रस्त्यांच्या ट्रॅफिकच्या हिशोबाने डेटा तयार केला जाणार आहे. मात्र या डेटाच्या आधारे भारतीय रस्त्यांवर हि कार धावणे मोठे आव्हान असणार आहे. विप्रो आर्टिफिशियल इंटेलीजेंस सिस्टीम आणि रोबोटिक विभागाचे प्रमुख डॉ. रामचंद्र बुदिहाल यांच्या मते त्यांची टीम भारतीय रस्त्यांच्या अवस्थेनुसार या गाडीवर काम करत असून यामुळे हि गाडी भारतीय रस्त्यांवर देखील व्यवस्थित धावू शकणार आहे.

200 लोकांची टीम करत आहे काम

चालकविरहित कार बनवण्यासाठी जवळपास 200 लोकांची टीम सध्या कार्यरत आहे.  IISc च्या सहा विभागांमध्ये हे काम सुरु आहे. त्याचबरोबर डेटा कलेक्शन आणि सेन्सरवर बेंगळुरू येथे मागील सहा महिन्यांपासून काम सुरु आहे. या गाडीमध्ये जवळपास 28 सेन्सर लावण्यात आले आहेत. त्यामुळे हि गाडी बनण्यासाठी आणखी खूप वेळ जाणार आहे.