बॉर्डरवर गोळीबार करणं चांगलंच महागात पडलं पाकिस्तानला, भारतीय जवानांनी 3 दिवसात केलं 17 सैनिकांना ठार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानकडून गेल्या अनेक दिवसांपासून जम्मू-काश्मिरमधील नियंत्रण रेषेवर (LOC) गोळीबार करत आहे. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय सैनिकांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सुरक्षा दलाने सोमवारी दोन पाकिस्तानी सैनिकांना ठार केले. तर गेल्या 3 दिवसांमध्ये 17 पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. या दरम्यान पाकिस्तानी लष्कराच्या अनेक फॉडवर्ड पोस्टचेही नुकसान झाले आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या सैन्याने यावर्षी दोन हजाराहून अधिक वेळा युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशीरापर्यंत भारतीय सैन्याने केलेल्या मोठ्या कारवाईत पीओकेच्या निकियाल सेक्टरमध्ये पाक लष्कराचे 6 जवान ठार झाले आहेत. तर सकाळी दोन पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. यावेळी पाक लष्कराची चार फॉडवर्ड पोस्टही उद्ध्वस्त झाली आहेत. हे सर्व सैनिक पाकिस्तान लष्कराच्या सिंध रेजिमेंटचे सैनिक होते. भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत डझनहून अधिक पाकिस्तानी सैनिक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी 20 आणि 21 जून रोजी पाक सैनिकांना मोठे नुकसान सोसावे लागले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने पहिल्यांदा भारतीय लष्कराच्या चौकीवर हल्ला केला होता. प्रत्युत्तरात भारतीय सैन्यांनेही जोरदार प्रत्युत्तर दिले. भारतीय सैन्याने अशा प्रकारे कारवाई केली की, पाक सैन्यांना त्यांची ठिकाणं सोडून पळून जाण्यास भाग पाडले. सुत्रांच्या माहितीनुसार, दोन दिवसांमध्ये भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईत हाजीपीर सेक्टर, बदेरी सेक्टर, बगसर सेक्टर, जंदरोट आणि डेरा शेख खान मध्ये पाक सैन्याचे 9 जवान ठार केले.

भारतीय सैनिक नौशेरा सेक्टरमध्ये शहीद
विशेष म्हणजे सोमवारी सकाळी पाकिस्तानकडून पुन्हा युद्धबंदीचे उल्लंघन करण्यात आले. सोमवारी पहाटे जम्मू-काश्मिरमधील राजौरी आणि पुंछ जिल्ह्यांना लक्ष्य करत पाकिस्तानने गोळीबार करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानने राजौरीच्या नौशेरा सेक्टर आणि पुंछच्या कृष्णा व्हॅली सेक्टरमध्ये गोळीबार केला, यामध्ये एक जवान शहीद झाला तर एक जवान जखमी झाला.