अमेरिकेत भारतीय युवकाची गोळी घालून हत्या

लॉस एन्जलिस : वृत्तसंस्था – अमेरिकेच्या लॉस एन्जलिसमध्ये एका दुकानात भारतीय नागरिक मनिंदर सिंह साही यांची शनिवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. स्थानिक पोलिसांनी ही माहिती दिली. साही (31) विवाहित असून त्यांना दोन मुले आहेत. साही हे हरियाणातील करनाल येथील रहिवाशी होते. त्यांना अमेरिकेत येऊन सहा महिनेदखील झाले नव्हते. ते कॅलिफोर्नियाच्या लॉस एन्जलिस काउंटीच्या विट्टेयर सिटीतील 7-इलेव्हन ग्रोसरी स्टोअरमध्ये काम करत होते. अमेरिकेतील त्यांच्या नातेवाईकाने सांगितले की, ते घरातील एकमेव कमावणारे व्यक्ती होते. पत्नी तसेच मुलांसाठी ते पैसे पाठवत असत.

विट्टेयर पोलीस विभागाच्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी सकाळी पाच वाजून 43 मिनिटांच्या सुमारास घडली. प्राथमिक अंदाजानुसार अज्ञात आरोपी शस्त्रासह दुकानात आला होता. पोलिसांनी संशयिताचे छायाचित्र जारी केले आहे. पोलिसांनी सांगितले की, कोणतेही कारण नसताना आरोपीने पिस्तुलातून गोळ्या झाडल्या ज्यामुळे क्लार्कचा मृत्यू झाला. संशयित या घटनेनंतर फरार झाला आहे.

स्टोअरच्या आतमध्ये यावेळी दोन ग्राहक होते, ते दोघेही जखमी झाले आहेत. संशयित एक कृष्णवर्णीय व्यक्ती होता. त्यांने तोंड थोडे झाकले होते. साही यांच्या भावाने पैसे जमवून भावाचा मृतदेह भारतात आणण्यासाठी गो-फंड पेज सुरू केले आहे. भावाने गो-फंड पेजवर रविवारी लिहिले की, त्याच्या कुटुंबात आई, वडील आणि पाच तसेच नऊ वर्षांची दोन मुले आहेत. मी त्यांचा मृतदेह भारतात घेऊन जाण्यासाठी तुमच्याकडे मदत मागत आहे, यामुळे त्यांची पत्नी आणि मुलं त्यांचे अंतिम दर्शन घेऊ शकतील.

You might also like