पाकिस्तानमध्ये गेलेल्या महिलेचे जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा आरोप

इस्लामाबाद : वृत्तसंस्था
पाकिस्तानमधील इस्लामाबाद जवळ दरवर्षी शिरोमणी गुरुद्वारा समितीतर्फे एका तीर्थयात्रेचे आयोजन केले जाते. दरवर्षी प्रमाणे यंदाही या यात्रेचे आयोजन केले होते. या यात्रेत शेकडो भाविक सहभागी होतात. यावर्षी मात्र या यात्रेत सहभागी झालेल्या एका भारतीय महिलेचे जबरदस्तीने धर्मांतर केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

काय आहे प्रकरण
पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यात राहणारी किरन बाला ही महिला १२ एप्रिल रोजी पाकिस्तानमध्ये यात्रेसाठी गेली होती. शिरोमणी गुरुद्वारा समितीतर्फे आयोजित तीर्थयात्रेत ती सहभागी झाली होती. या वर्षी १८०० भाविक पाकिस्तानमध्ये गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यात किरण बालाचा समावेश होता परंतु ,पाच दिवसांपूर्वी किरण बाला बेपत्ता झाली. तिच्याशी संपर्क होत नसल्याने कुटुंबीय देखील चिंतेत होते. दुसरीकडे किरण बालाने पाकिस्तानमधील भारतीय दुतावासाला एक पत्र पाठवले आहे. या पत्रात तिने दुसरे लग्न केल्याचा दावा केला आहे. किरण बालाच्या या पत्राने होशियारपूरमध्ये राहणाऱ्या तिच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. त्यांना किरणचे जबरदस्तीने धर्मांतर करून तिच्याशी लग्न केल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, तिच्या कुटुंबीयांनी किरणची सुटका करण्यासाठी सरकारकडे मदत मागितली आहे.