नाशिक : गणेश विसर्जनासाठी गेलेल्या लष्करी जवानाचा विहिरीत बुडून मृत्यू

नाशिक : देवळा तालुक्यातील वखाली येथे गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या लष्करी जवानाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. प्रशांत वसंत गुंजाळ (वय २७) असे या जवानाचे नाव आहे.

संपूर्ण राज्यात लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला जात असताना नाशिकमध्ये या घटनेमुळे गालबोट लागले. प्रशांत गुंजाळ हा अरुणाचल प्रदेशमध्ये लष्करात कार्यरत आहे. दोन महिन्यांच्या सुट्टी घेऊन ते घरी आलेले होते. मात्र, गणेश विसर्जन करण्यासाठी गेले असता विहिरीमध्ये बुडून गेल्यांनतर त्यांचा मृत्यू झाला.

सविस्तर वृत्त असे की, प्रशांत गुंजाळ २६ ऑगस्ट रोजी दोन महिन्यांची सुट्टी घेऊन आपल्या गावी आलेले होते. त्यांचे घर मळ्यात असल्यामुळे घरातील गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात मळ्यातील विहिरीवर गेले. पावसाळा असल्यामुळे विहिरीच्या पाण्याची पातळी वाढलेली होती. दरम्यान, प्रशांत यांचा तोल गेल्याने विहिरीत पडले. त्यातच त्यांचा बुडून मृत्यू झाला.