महाराष्ट्रातील दाम्पत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू, मुलगी बाल्कनीत रडत असल्याने घटनेचा पर्दाफाश

पोलीसनामा ऑनलाइन – अमेरिकेत एका भारतीय दांपत्याचे मृतदेह संशयास्पदरित्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, न्यू जर्सीमधील नॉर्थ अर्लिंग्टन येथील अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास असणाऱ्या दांपत्याचा चाकूने वार झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. मूळचे अंबाजोगाई (जि. बीड) येथील असलेल्या या दांपत्याची मुलगी बाल्कनीत एकटी रडताना शेजा-यांनी पाहिल्यांने ही घटना उघडकीस आली. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. अमेरिकन प्रशासनाने मृतदेह भारतात येण्यासाठी आठ ते दहा दिवस लागतील असे कळवल्याची माहिती कुटुंबियांनी दिली.

बालाजी भारत रुद्रवार (वय 32) आणि आरती बालाजी रुद्रवार (वय 30) अशी या मृत पती-पत्नीची नावे आहेत. आयटी कंपनीत कामाला असणारे बालाजी रुद्रवार ऑगस्ट 2015 मध्ये पत्नीसोबत अमेरिकेत स्थायिक झाले होते. डिसेंबर 2014 मध्ये त्यांचे लग्न झाले होते.

अमेरिकेतील मीडियाच्या वृत्तानुसार, बालाजी यांनी आरती यांच्यावर लिव्हिंग रुममध्ये चाकूने हल्ला केला. आरती यांनी हल्ला रोखण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही.  बालाजीचे वडील भारत रुद्रवार यांनी पीटीआयशी बोलताना दिलेल्या वृत्तानुसार, माझी नात बाल्कनीत एकटीच रडत असल्याचे पाहून शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन करुन माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यावेळी मृतदेह आढळून आले. वैद्यकीय तपासणीत चाकूने वार केल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी मला शवविच्छेदन अहवालातील माहिती देऊ असे सांगितल्याचे रुदवार म्हणाले. माझी सून सात महिन्यांची गर्भवती होती. आम्ही अमेरिकेला जाऊन आलो होतो. आता पुन्हा एकदा अमेरिकेला जाऊन त्यांना भेटण्याबद्दल विचार सुरु होता अशी माहिती त्यांनी दिली. यामागे काही कटकारस्थान आहे असे वाटत का अशी विचारणा केली असता ते म्हणाले की, यामागे काय हेतू असावा याची मला कल्पना नाही. पण ते एक आनंदी कुटुंब होते, असे ते म्हणाले.