नोकरदारांसाठी मोठी खुशखबर ! यावर्षी मिळणार ‘एवढी’ पगारवाढ, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एऑन या मानव संसाधन क्षेत्रातील संस्थेने एका अहवालातून पगार वाढीचा अंदाज वर्तवला आहे. या अहवालानुसार भारतातील नोकरदारांना ९. १ टक्के पगारवाढ मिळणार असल्याची शक्यता आहे. आशिया पॅसिफिक पट्ट्यात असणाऱ्या इतर कोणत्याही देशातील नोकरदारांपेक्षा ही पगारवाढ सर्वाधिक असणार आहे.

गेल्या दहा वर्षांतली ही सर्वाधिक कमी पगारवाढ असली तरीही आशिया पट्ट्यातील भारतीयांना मिळणारी पगारवाढ ही जास्तच आहे. तरी भारतीय कंपन्या पगारवाढ ही कर्मचाऱ्यांच्या कौशल्यावर आधारित देतील असे अहवालात म्हटले गेले आहे. गेल्या वर्षीची पगारवाढीची सरासरी ही ९. ३ टक्के इतकी होती.

यंदा ३९ भारतीय कंपन्या ह्या १० टक्के पगारवाढ देऊ शकतात, तसेच ४२ कंपन्या ८ ते १० टक्के पगारवाढ करू शकतात असे अहवालात म्हटले आहे. वीस पेक्षा जास्त क्षेत्रातील १ हजार कंपन्यांकडून मिळालेल्या आकडेवारीपासून एऑन ने अहवाल तयार केला आहे. ई – कॉमर्स आणि व्यवसायिक कंपन्या १० टक्के वेतनवाढ देऊ शकतात. औषध कंपन्या यावर्षी सर्वाधिक वाढ देणार आहे.

२०१९ मध्ये भारतातल्या कंपन्यांना आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागला. तरी सुद्धा भारतीय कंपन्या पगारवाढीबद्दल सकारात्मक दिसून येत आहेत. त्यामुळे वेतनवाढीच्या बाबतीत भारत हा प्रथम क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे, असे एऑन च्या झीटेल फर्नाडिस यांनी सांगितले.

आशिया पॅसिफिक पट्ट्यात येणाऱ्या देशांचा विचार केल्यास पगारवाढीच्या बाबतीत भारत पहिल्या क्रमांकावर असेल त्यानंतर चीनचा (६.३ टक्के) क्रमांक लागेल, फिलिपिन्स (५.८), मलेशिया (५.३) तसेच सिंगापूर आणि आस्ट्रेलिया अनुक्रमे (३.८) आणि (३.१) यांचा क्रमांक असेल.