भारतीय विद्यार्थ्यांच्या अटकेविरोधात परराष्ट्र मंत्रालयाकडून निषेध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेत बनावट विद्यापीठात प्रवेश घेऊन वास्तव्य वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना अटक केल्याच्या विरोधात अमेरिकी दूतावासाच्या कर्मचाऱ्यास भारताने निषेध खलिता दिला आहे. या विद्यार्थ्यांचा राजनैतिक संपर्क ताबडतोब देण्यात यावा असे सांगण्यात आले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांना अटक करण्यात आल्याच्या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. यातून मार्ग काढण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यात येत आहेत. अमेरिकेतील एका बोगस विद्यापीठात या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता पण त्यांना ते विद्यापीठ बोगस आहे याची माहिती नव्हती. त्यामुळे त्यांनी अजाणतेपणातून हे कृत्य केले आहे असे भारताचे म्हणणे आहे. एकूण १३८ परदेशी विद्यार्थ्यांना अमेरिकी स्थलांतर अधिकाऱ्यांनी बोगस विद्यापीठात प्रवेश घेऊन वास्तव्य वाढवण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी अटक केली आहे. स्थलांतर व सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी बुधवारी या विद्यार्थ्यांना अटक केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकी दूतावासाला दिलेल्या निषेध खलित्याबाबत अमेरिकी प्रवक्त्याने सांगितले की, भारताने विद्यार्थ्यांच्या अटकेबाबत पाठवलेला निषेध खलिता आम्हाला मिळाला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, या विद्यार्थ्यांची काळजी घेतली जावी. तेथील भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्याशी संपर्क साधून द्यावा. ज्या विद्यापीठाने या विद्यार्थ्यांना गंडा घातला त्याच्या अधिकाºयांना व भारतीय अधिकाऱ्यांना वेगळी वागणूक देण्याचे अमेरिकेने टाळावे. अमेरिकेने विद्यार्थ्यांची माहिती तातडीने द्यावी. त्यांना अटकेतून मुक्त करावे तसेच त्यांच्या इच्छेविरोधात परत पाठवू नये.

भारतीय दूतावासाने वेगवेगळ्या स्थानबद्धता केंद्रास संपर्क साधण्याचा प्रयत्न करून भारतीय विद्यार्थ्यांना मदत करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. आतापर्यंत किमान ३० भारतीय विद्यार्थ्यांशी संपर्क करण्यात यश आले आहे. उर्वरित विद्यार्थ्यांशी संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परराष्ट्र मंत्रालय चोवीस तास भारतीय दूतावासाच्या संपर्कात असून हेल्पलाइन क्रामंक पुढील प्रमाणे आहेत. +१-२०२-३२२-११९०  व +१-२०२-३४०-२५९०  याशिवाय इमेल पत्ता असा आहे.