Good News ! भारतातील 14.2 लाख रुग्ण झाले ‘कोरोना’मुक्त

पोलीसनामा ऑनलाइन – भारतात सध्या कोरोनाच संकट आहे. अशात एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे आता ६८.४ टक्के इतकं झालं आहे. शनिवारपर्यंत देशात १४.२ लाख जण कोरोनातून उपचार घेऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोनमुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून देशाचा रिकव्हरी रेट सुद्धा वाढल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

तसेच कोरोनामुळे होणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण कमी करण्यात यश आलं असून त्याची टक्केवारी २.०४ इतकी झाली आहे. देशात शनिवारी तब्बल ६१ हजार ५३७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. यामुळे देशातील कोरोना संसर्गित रुग्णांचा आकडा वाढून २० लाख ८८ हजार ६१२ झाला आहे. तर मृतांचा आकडा ४२ हजार ५१८ वर पोहचला. सध्या ६ लाख १९ हजार ८८ रुग्णांवर उपचार (सक्रिय रुग्ण ) सुरु आहेत.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी ४८ हजार ९०० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशाचा १५ जूनपर्यंत रिकव्हरी रेट ५१.०८ होता. तो आता वाढून ६८.३२ टक्क्यांवर गेला आहे.

महाराष्ट्राने पार केला ५ लाखांचा आकडा

दरम्यान, राज्यात शनिवारी उच्चांकी १२ हजार ८२२ रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्या ५ लाख ३ हजार ८४ झाली. तसेच राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं आहे. शनिवार ११ हजार ८१ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत ३ लाख ३८ हजार २६२ रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ६७.२६ टक्के झाला आहे. शनिवारी २७५ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृत रुग्णांची संख्या १७ हजार ३६७ इतकी झाली आहे.