‘भारतात हिंदू राष्ट्र्वादाचं पुनरागमन’ : विदेशी मीडिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी सरकारने अभूतपूर्व यश संपादन करताना काँग्रेससह विरोधकांचा सुपडा साफ केला असला तरी जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात यंदा मात्र ‘हिंदू राष्ट्र्वादाचं पुनरागमन ‘अशा शब्दात विदेशी मीडियाने वर्णन केले आहे. शिवाय मोदी सरकारच्या पाच वर्षाच्या अपयशी कारभारावरही टिकाटीपणी केली आहे.

‘राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक जिंकली,’ अशी हेडिंग ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने दिली आहे. ‘भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाने जगातील सर्वात मोठ्या निवडणुकीत विजय मिळविला आहे. भारतीय मतदारांनी मोदींच्या सर्वशक्तिमान आणि हिंदूत्ववादी या प्रतिमेवर शिक्कामोर्तब केलं आहे,’ असंही वाशिंग्टन पोस्टनं म्हटलं आहे. तर ‘गल्फ न्यूज’ने “TSUNAMO 2.0 SWEEPS INDIA” असं शीर्षक देऊन मोदींच्या विजयाचं वर्णन केलं आहे. मोदींच्या लोकप्रियतेमुळे भारतीय राजकारणाने आता हिंदू राष्ट्रवादाच्या नव्या युगात प्रवेश केला आहे. मोदींचा विजय होणं भारतासाठी वाईट गोष्ट आहे.

अल्पसंख्यांकांना दुय्यम दर्जा देणाऱ्या राष्ट्रवादी नेत्याची जगाला गरज नाही, अशा शब्दात ‘द गार्डियन’ने मोदींवर टीका केली आहे. मोदींचा विजय हा धार्मिक राष्ट्रवादाचा विजय आहे. तो भारताच्या धर्मनिरपेक्ष मार्गापेक्षा वेगळा असून हिंदू राष्ट्रवादाच्या मार्गावर जाणारा आहे. ८० टक्के हिंदू भारतात राहतात. मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि बौद्ध धर्मीयांसह इतर धर्माचे लोकही भारतात राहतात, असंही या वृत्तपत्रानं म्हटलं आहे. ‘भारताचे चौकीदार नरेंद्र मोदींचा ऐतिहासिक विजय,’ अशा शब्दांत ‘न्युयॉर्क टाइम्स’ने मोदींच्या विजयाचं वर्णन केलं आहे.

मोदींनी स्वत:ला भारताचा चौकीदार म्हटलंय. मात्र त्यांच्या काळात अल्पसंख्याकांना असुरक्षित वाटत होतं. उद्योगपतींना मदत करतानाच दुसरीकडे मात्र ते त्यांच्या गरिबीचेही दाखले देत होते. ते व्यापाऱ्यांसारखे बोलायचे, पण त्यांनी तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिले नाहीत. हा विरोधाभास असतानाही त्यांनी हिंदू राष्ट्रवादाच्या सहाय्याने भारतात ऐतिहासिक विजय मिळविला आहे, असं न्युयॉर्क टाइम्सनं म्हटलंय. तर चीनच्या ‘ग्लोबल टाइम्स’ने मोदींसमोर रोजगार, बँकिंग सेक्टर आणि शेतीविषयक समस्यांचं आव्हान असणार असल्याचं म्हटलं आहे. तर मोदींनी साधू सारखी त्यांची प्रतिमा निर्माण केली. त्यामुळे वैश्विक राजकारणात भारताचा दर्जा उंचावण्यात मदतच होईल.

मोदींनी संसदीय निवडणुकीतील सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यांची लढाई ‘पर्सनॅलिटी कल्ट’मध्ये बदलली, असं न्यूज एजन्सी ‘एपी’नं म्हटलंय. पाकिस्तानच्या ‘डॉन’नंही मोदींच्या विजयाची बातमी पहिल्या पानावर देऊन त्यावर अग्रलेखही लिहिला आहे तसेच अल जजिराने मोदी हे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान असे वर्णन करताना बालाकोट एअरस्ट्राईकचे कोरिओग्राफर असल्याचे ठसवित विखुरलेल्या विरोधकांवर मात केल्याचे म्हटले आहे.