लस निर्मितीबाबत Serum चे CEO पुनावालांचे स्पष्टीकरण, म्हणाले – ‘पुढील काही महिने जाणवणार लसींची कमतरता’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अशातच लस हाच कोरोनावरील उपाय असल्याचे म्हटले जात असून देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. देशात ज्येष्ठ नागरिक आणि त्यानंतर 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. त्यानंतर आता 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येत आहे. परंतु सध्या पुढील काही महिने लसींची कमतरता भासू शकते, असे मत कोविशिल्ड लसीची निर्मिती करणा-या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी व्यक्त केले आहे. 10 कोटी लसी उत्पादन करण्याची क्षमता जुलै महिन्यापूर्वी वाढू शकणार नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे.

पुनावाला यांनी फायनॅन्शिअल टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, सध्या देशात महिन्याला 6 ते 7 कोटी लसींची निर्मिती होत आहे. यापूर्वी आपल्याकडे तितक्या प्रमाणात मागणी नसल्याने क्षमतेचा विस्तार केला नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे लसींची कमतरता जुलै महिन्यापर्यंत भासणार असल्याचे ते म्हणाले. आमच्याकडे कोणतीही ऑर्डर नव्हती. आम्हाला वर्षाला 100 कोटीपेक्षा अधिक डोस उत्पादन करण्याची गरज भासेल असे वाटले नव्हते. तसेच जानेवारीत दुसरी लाट येईल, असे वाटत नव्हते. प्रत्येकाला कोरोना संपुष्टात आल्याचे वाटत होते, असे ते म्हणाले. आपल्या कंपनीचा बचाव करताना पूनावाला यांनी लसीच्या कमतरतेबाबत राजकीय लोकांकडून आणि टीकाकारांकडून सीरम इन्स्टिट्यूटला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले. आमच्याकडे यापूर्वी कोणताही आदेश नव्हता. तसेच वर्षाला 100 कोटी लसींच्या डोसच उत्पादन करावे लागेल, असे आम्हाला वाटले नव्हते, पुनावाला यांनी स्पष्ट केले आहे.